निवडणुका हायजॅक करण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर, ममता बॅनर्जींचा भाजपवर कडाडून हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणुका हायजॅक करण्यासाठी भाजपने निवडणूक आयोगाचा वापर केला, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. पक्षाविरोधात 14 हजार खटले दाखल झाले असून गरज भासल्यास आपण सर्वोच्च न्यायालयासोबतच आंतरराष्ट्रीय न्यायालयातदेखील धाव घेऊ असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

तृणमूल छात्र परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त कोलकाता येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाजपवर जोरदार हल्ला चढवताना ममता म्हणाल्या, भाजप फुटीचे राजकारण करत असून भीती दाखवण्यासाठी पोलिसांचा वापर करत आहे. मतदार याद्यांमधून लाखो नावे बेकायदा हटवून मत चोरीसाठी एसआयआरचा वापर करण्यात आला. विधानसभा निवडणूक हायजॅक करण्यासाठी भाजपने निवडणूक आयोगाचा वापर केला. मी लवकरच राज्याचा दौरा सुरू करणार आहे. माझ्या सभांना परवानगी न दिल्यास रस्त्यावर उतरून जनतेमध्ये मी जाणार. बघू, त्यांच्याकडे किती अंडी आणि वीटा जमा आहेत, असे ममता म्हणाल्या.

भाजपने पोलिसांना राक्षसी संस्था बनविले

तृणमूलच्या शासन काळात पोलिसांचा मानवतावादी चेहरा होता. परंतु, भाजपने पोलिसांना राक्षसी संस्थेत बदलले, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. समर्थकांविरोधात पोलिसांकडून होणारा बळाचा वापर मी रोखणार आहे. हा माझा रक्षाबंधनानिमित्त संकल्प आहे, असे ममता म्हणाल्या.

गद्दारांसाठी पक्षाचे दरवाजे बंद

पक्ष सोडून गेलेले खासदार आणि आमदारांना पक्षाचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचे तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी स्पष्ट केले. स्वतःच्या स्वार्थासाठी कठीण परिस्थितीत पक्षाची साथ सोडणाऱ्यांना पक्षात कदापि परतू दिले जाणार नाही, असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

तुरुंगातील जेवण खा, पण भाजपचे नको

ममता बॅनर्जी यांनी विद्यार्थी आणि तरुणांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, गरज पडल्यास तुरुंगात जा, महिनाभर तुरुंगातील जेवण खा, पण भाजपचे जेवण खाऊ नका, असे ममता म्हणाल्या.