
मातृदिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘आई’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कथा, कविता, किस्से आणि गाण्यांमधून आईची महती सांगणारा हा कार्यक्रम १० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता विलेपार्ले (पूर्व) येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात अर्चना गोरे, प्रीती जोशी, चैत्रल पोतदार, डॉ. जय आजगावकर, ज्ञानेश पेंढारकर आणि राजू ठाकूरदेसाई गाणी सादर करतील. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन व निवेदन अनिल हर्डीकर यांचे आहे. संगीत संयोजन सत्यजित प्रभू यांचे असून निवेदिता सराफ या सहनिवेदिका आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका ९ सप्टेंबरपासून नाट्यगृहावर उपलब्ध असतील.






























































