
मुदतबाह्य आणि भंगारात काढलेल्या हजारो स्क्रॅप रिक्षा राज्यात धावत असून त्यामुळे त्यातून प्रवास करणाऱ्या लाखो लोकांच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. याची गंभीर दखल घेत स्क्रॅप रिक्षांविरोधात परिवहन विभागाने कडक कारवाई सुरू केली असून, ही मोहीम 5 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या स्क्रॅप रिक्षा वापरणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करा, 5 ऑक्टोबरपर्यंत एकही स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यानंतर परिवहन विभागाने मोहीम हाती घेतली.
स्क्रॅप झालेल्या किंवा नियमबाह्य रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे मोठय़ा प्रमाणात आल्या होत्या. त्यासंदर्भात परिवहन मंत्री सरनाईक यांनी परिवहन आयुक्त कार्यालयात आज विशेष बैठक घेतली. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, रिक्षा-टॅक्सी युनियनचे नेते शशांक राव तसेच राज्यभरातील विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
परिवहनमंत्र्यांचे निर्देश
नियमबाह्य आणि धोकादायक वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास कोणतीही मुभा दिली जाणार नाही.
स्क्रॅप घोषित झालेल्या रिक्षांचा पुन्हा वापर करणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची नोंदणी किंवा नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणे या गोष्टींना आळा घाला. संबंधित वाहनचालकावर कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी कठोर पावले उचला.
सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी त्यांनी केलेल्या कारवाईचा अहवालही सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.





























































