घोषणा ऐकता ऐकता मराठवाड्यातली पिढी बदलली, पण दुष्काळ तसाच! अंबादास दानवेंचा हल्लाबोल, फडणवीसांचा व्हिडीओ केला शेअर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडा मुक्तिसंग्रामाला 78 वर्षे पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणा, रखडलेली विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. घोषणा ऐकता ऐकता मराठवाड्यातली पिढी बदलली, पण दुष्काळ तसाच, अशी टीका अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ एक्स अकाऊंटवर शेअर करून केली आहे.

उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी तेच ठरलेलं पालुपद पुन्हा कानावर पडेल ‘मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही!’ घोषणा ऐकता ऐकता मराठवाड्यातली पिढी बदलली, पण दुष्काळ तसाच, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. यावेळी त्यांनी ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’च्या नावाखाली गेल्या आठ वर्षांत केवळ फाईलींचा प्रवास कसा झाला, याचा हा वस्तुनिष्ठ लेखाजोखाही मांडला.

1. ऑगस्ट 2018 – मराठवाड्यातील 11 धरणे बंदिस्त पाईपलाईनने जोडण्यासाठी इस्रायलच्या मेकोरोट कंपनीशी सामंजस्य करार.
2. जून 2019 – 1330 किमी लांबीच्या मुख्य पाईपलाईनसाठी मंत्रिमंडळाची केवळ कागदी तत्त्वतः मंजुरी.
3. सप्टेंबर 2019 – निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील पहिल्या टप्प्यासाठी 4293 कोटींची प्रशासकीय मान्यता व निविदा.
4. वर्ष 2020-21 – उद्धव ठाकरे सरकारने प्रकल्पाचा 50 टक्के आर्थिक भार उचलण्याची तयारी दाखवत केंद्राकडे ‘राष्ट्रीय प्रकल्पा’चा दर्जा मागितला; पण केंद्राकडून दमडीही मिळाली नाही.
5. जुलै 2022 – सत्तांतरानंतर आलेल्या सरकारने संपूर्ण खर्चाचा भार केंद्रावर ढकलला. बुलेट ट्रेनसाठी हजारो कोटींचा निधी तत्काळ मंजूर झाला, पण मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मात्र हात आखडताच राहिला.
6. सप्टेंबर 2023 – संभाजीनगरच्या विशेष कॅबिनेटमध्ये बाह्य संस्थांकडून कर्ज उभारण्याचा पुन्हा पोकळ पुनरुच्चार झाला; फाईल केंद्राकडे वर्ग आणि जमिनीवर काम मात्र शून्य!

दीड महिन्यापासून पाऊस नाही… खरीप पिके करपली… पिण्यासाठीही पाणी मिळेना; मराठवाड्यात भीषण दुष्काळ, मंत्रिमंडळ बैठकीत चिंता

एकूण निष्पन्न = शून्य = पुढच्या पिढीच्या नशिबी पुन्हा दुष्काळ! वास्तव हेच आहे की दुष्काळ दिसावा, त्यावर गळे काढत राजकीय चर्चा झडाव्यात, प्रत्यक्षात कधीही हातात न पडणारी खोटी ‘पॅकेजेस’ जाहीर व्हावीत आणि सत्तेचे इव्हेंट साजरे व्हावेत… यासाठीच हा सगळा आटापिटा सुरू आहे, असा टोलाही दानवे यांनी लगावला.

मुक्तिसंग्रामदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; आज मध्यरात्री हुतात्म्यांना करणार अभिवादन