दिल्ली-मुंबई महामार्गावर दोन कार दरीत कोसळल्या; अपघातात 4 ठार, 8 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली-मुंबई महामार्गावर दोन कार दरीत कोसळल्याने अपघातात चार जण ठार झाले असून 8 जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त एका कारमधील कुटुंब मुंबईचे रहिवासी असून दुसऱ्या कारमधील कुटुंब गुजरातचे रहिवासी आहेत. पहिला अपघात मंगळवारी पहाटे 4 वाजता तर दुसरा अपघात सकाळी 6 वाजता झाला.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात दिल्ली-मुंबई महामार्गावर हे दोन्ही अपघात झाले. अपघातांचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघातात दोन्ही कारमधील दोन दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी जावरा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन्ही कार दिल्लीच्या दिशेने जात होत्या. पहिल्या अपघातात मुंबईतील रहिवासी नरेंद्र कौर (67) आणि मनप्रीत कौर (32) यांचा मृत्यू झाला. तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. दुसऱ्या अपघातात मृत्यू झालेले दोन्ही व्यक्ती गुजरातमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.