
शेअर बाजार गुरुवारी पुन्हा एकदा कोसळला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीने संथपणे व्यवहार सुरू केले. सुरुवातीच्या व्यवहारानंतर दोन्ही निर्देशांक हिरव्या झोनमध्ये आले.मात्र,दुपारच्या सत्रात शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
दुपारी १ वाजेपर्यंत दोन्ही निर्देशांक अचानक खाली येऊ लागले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक सेन्सेक्स ९५० हून अधिक अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीदेखील ३१९ अंकांनी खाली आला. शेअर बाजारातील या अचानक आलेल्या उलथापालथीमध्ये, टाटापासून महिंद्रापर्यंतचे प्रमुख शेअर्स कोसळले. ऑटो इंडेक्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली, तो ३% पेक्षा जास्त खाली आला.
बीएसई सेन्सेक्स ७२,४८० च्या मागील बंद भावापेक्षा घसरून ७२,१९२ वर उघडला आणि काही काळ त्यात किरकोळ चढ-उतार दिसून आले. तथापि, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास, बीएसई सेन्सेक्सच्या घसरणीला अचानक वेग आला आणि तो ७१,५२७ पर्यंत कोसळला, म्हणजेच हा निर्देशांक त्याच्या मागील बंद भावाच्या तुलनेत ९५० हून अधिक अंकांनी खाली आला.
निफ्टीची वाटचालही सेन्सेक्ससारखीच दिसून आली. हा निर्देशांक त्याच्या मागील बंद भावापेक्षा (२२,६२०) खाली येऊन २२,५४३ वर उघडला आणि नंतर, सेन्सेक्सच्या बरोबरीने २२,३०१ पर्यंत घसरला.
शेअर बाजारातील घसरणीमागील प्रमुख कारणांबद्दल बोलायचे झाल्यास, परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली जलद विक्री हे सर्वात महत्त्वाचे कारण होते. यूएस ट्रेझरी यील्ड्समधील वाढीमुळे याला चालना मिळाली. ही विक्री गेल्या पाच ट्रेडिंग दिवसांपासून सुरू आहे. केवळ ३० सप्टेंबर रोजीच १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची विक्री दिसून आली.
भारतीय रुपयाच्या घसरणीमुळे बाजारावर परिणाम झाला आहे. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ९५.९८ पर्यंत घसरला. दरम्यान, शेअर बाजारातील भीतीचे मापक मानला जाणारा इंडिया व्हीआयएक्स (VIX) सुमारे ५ टक्क्यांनी वाढून १४.१३ वर पोहोचला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.



























































