
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी एक मोठी दुर्घटना टळली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या कुवैती ध्वज असलेल्या ‘एमटी काझिमा III’ या कच्च्या तेलाच्या टँकरवर क्षेपणास्त्राने हल्ला झाला. या जहाजावर पाच हिंदुस्थानी नागरिक खलाशी म्हणून कार्यरत होते. ओमानमधील हिंदुस्थानी दूतावासाने तातडीने सूत्रे हलवून ओमान प्रशासनाच्या सहकार्याने या पाचही हिंदुस्थानी नागरिकांना सुखरूप किनाऱ्यावर आणले आहे.
हिंदुस्थानच्या दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर याबाबत माहिती देताना ओमानच्या प्रशासनाला त्यांच्या मोलाच्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. हे कुवैती टँकर हल्ल्याच्या वेळी टोगोमधील लोमे बंदराच्या दिशेने जात होते.
Earlier today, the Mission coordinated rescue of five Indian nationals on board the Kuwait-flagged tanker MT Kazimah III, struck by a projectile in the Strait of Hormuz.
All 5 Indian nationals have been shifted ashore safely.
We thank the Omani authorities for their continued…
— India in Oman (Embassy of India, Muscat) (@Indemb_Muscat) October 2, 2026
सध्या पर्शियन आखातात आणि प्रमुख सागरी मार्गांवर सुरक्षेचा धोका अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान सरकार आणि येथील दूतावास खलाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याआधी मंगळवारी, 29 सप्टेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पर्शियन आखातात हिंदुस्थानचा तिरंगा असलेली सहा आणि हिंदुस्थानासाठी माल वाहून नेणारी परदेशी ध्वजाची सहा अशी एकूण बारा व्यापारी जहाजे कार्यरत आहेत. या जहाजांवर अंदाजे 163 हिंदुस्थानी खलाशी असून, याशिवाय परिसरातील विविध व्यापारी जहाजांवर चार हजार पाचशेहून अधिक हिंदुस्थानी खलाशी सेवा बजावत आहेत. नौवहन मंत्रालय, हिंदुस्थानी राजनैतिक दूतावास आणि स्थानिक हितधारक यांच्या संयुक्त सहकार्यातून या सर्व जहाजांच्या हालचालींवर सतत नजर ठेवण्यात येत असून खलाशांच्या कल्याणाची संपूर्ण काळजी घेतली जात आहे.































































