
पंजाबमधील अमृतसर येथे एका धक्कादायक घटनेत प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मॅड (मॅडी) संधू याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी मॅड संधू याच्यावर थेट गोळीबार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संधूला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मॅड संधू हा सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय होता आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून त्याने स्वतःची मोठी ओळख निर्माण केली होती. त्याचे अनेक फॉलोअर्स असल्याने या हत्येच्या बातमीने सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, हल्लेखोर कोण होते आणि या हत्येमागील नेमके कारण काय, याचा पोलीस शोध घेत आहेत.



























































