
निवडणूक आयोगातील भ्रष्टाचार व निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवारी मुंबईत अतिविराट मोर्चा पार पडला. या मोर्चात महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यामुळे धडकी भरलेल्या भाजप नेत्यांनी या मोर्चावर टीका केली. त्यांच्या या टीकेला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी संजय राऊत यांनी भाजप नेहमी लबाड कोल्ह्याच्या भूमिकेत असतो त्यामुळे त्यांना कोल्हेकुईच ऐकायला येणार, वाघाची गर्जना नाही, असा जोरदार घणाघात केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला आता उतरती कळा लागलेली दिसतेय, असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
” ठाकरे बंधूंनी मुंबईत ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी अतिविराट मोर्चा काढला. लाखोंचा मोर्चा होता तो. अख्ख्या देशात त्या मोर्चाची चर्चा झाली. आशिष शेलारांनी त्या मोर्चाला कोल्हेकुई म्हटलं. मोर्चाचं नाव गर्जना होतं. गर्जना ही वाघाची असते आणि आता हे जे कोल्हे आहेत त्या कोल्ह्यांना कोल्हेकुईच ऐकायला येणार. या मोर्चाला लाखो वाघ जमले होते. ज्यांना लाखोंचा मोर्चा दिसत नाही त्यांच्या दृष्टीमध्ये दोष आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात फक्त मुंबईतच आंदोलन होत नाहीये तर संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू आहे. दिल्लीला छावनीचे स्वरुप आलेले आहे. मोदी शहांच्या घराबाहेर, इंडिया गेटला सशस्त्र दल, सीआरपीएफ, बॉर्डर सिक्यरिटी फोर्स अशा दलांनी संरक्षण दिलं आहे. ज्यांनी देशाच्या सीमेचे रक्षण केले पाहिजे त्यांना यांच्या संरक्षणासाठी दिल्लीत आणले गेले आहे. कपिल सिब्बल सारखे ज्येष्ठ वकील रस्त्यावर उतरले आहेत त्यांची तुम्ही चेष्ठा करतायत. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकरणाला बहुतेक उतरती कळा लागलेली दिसतेय. आम्ही त्यांना उर्जा द्यायचा प्रयत्न करतोय पण ते स्वत:च्या हाताने स्वत:चं नुकसान करताय. आपण दिल्लीत जाणार आहात. तुमचं स्थान दिल्लीत आहे, कालचा मोर्चा हा त्यांनी आत्मचिंतन करावं असा होता. मोदी करतात ते रडगाणं असतं, याने मला शिवी दिली. राहुल गांधींनी माझ्यावर टीका केली अशी रडगाणी त्यांची सुरू असतात. पण जेव्हा लाखो लोक रस्त्यावर उतरून एक मागणी करतात तेव्हा त्याला रडगाणं म्हणत नाही, ती क्रांती असते, ही गोष्ट जेव्हा फडणवीसांना समजेल तेव्हा ते केंद्रात सर्वोच्च पदावर जातील. आता ते फक्त पाईपलाईनमध्ये आहेत. त्यांचे जे हे प्रवक्ते आहेत शेलार त्यांनी चुकीची विधान करू नये”, असे संजय राऊत म्हणाले.
”भाजप नेहमी लबाड कोल्ह्यांच्या भूमिकेत असतो त्यामुळे त्यांना सगळे कोल्हेच दिसतात. गर्जना मोर्चाला ज्या पद्धतीने मुंबईकरांनी प्रतिसाद दिला ही देशाची भावना आहे. ज्ञानेश कुमार सारखा लफंगा, एक चोर एक दरोडेखोर जो जनतेच्या मतांवरती वरती दरोडा घालतो. कोट्यवधी मतं काढून भाजपला विजयी करायला हातभार लावतो त्याच्या विरोधात फक्त मोर्चा नाही अजून काही व्हायला हवे. ज्ञानेश कुमार, अमित शहा, सीमा खन्ना भुमिगत आहेत. या ना समोर”, असे आव्हानही संजय राऊत यांनी यावेळी दिले.
”देवेंद्र फडणवीस यांनी न्यायमूर्ती जस्टिस भुयान यांनाही गजनी बोलावे. भुयान यांनी जे परखड मत मांडले त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलावं. शेलारांनी देखील सांगावं की न्यायमूर्ती कोल्हेकुई करतायत. देशात सध्या क्रांतीचे वातावरण आहे. या क्रांतीच्या वातावरणामुळे भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. अखेरच्या काळात ब्रिटीशांचं देखील मानसिक संतुलन बिघडलं होतं. 1942 ला जेव्हा इस्ट इंडिया कंपनीला उतरती कळा लागली तेव्हा ब्रिटीश गांधी, नेहरू तसंच स्वातंत्र्य लढ्यातील इतर नेत्यांना काहीही बोलत होते, त्यांचा मेंदू हलला होता तसंच आता यांचा मेंदू हलला आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
































































