रोनाल्डोवर शिस्तीचा चाबूक, पोर्तुगालकडून तात्पुरते निलंबन; सहा महिन्यांच्या बंदीची टांगती तलवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुटबॉलच्या मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो आता शिस्तीच्या मैदानातच अडचणीत सापडला आहे. राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षण शिबीर सोडल्याप्रकरणी पोर्तुगाल फुटबॉल महासंघाने या स्टार कर्णधाराला तात्पुरते निलंबित केले असून त्याच्याविरुद्ध तातडीने शिस्तभंगाची चौकशी सुरू केली आहे. दोष सिद्ध झाल्यास रोनाल्डोवर एक ते सहा महिन्यांच्या निलंबनासह आर्थिक दंडाचीही कारवाई होऊ शकते, मात्र अंतिम शिक्षा अद्याप जाहीर झालेली नाही.

प्रशिक्षकाशी संघर्ष, शिबिराला रामराम

पोर्तुगालचा प्रशिक्षक जॉर्ज जीसस आणि रोनाल्डो यांच्यातील वादाने या प्रकरणाला तोंड फुटले. नॉर्वेविरुद्ध पोर्तुगालने 2-1 असा विजय मिळवला, मात्र रोनाल्डोला मैदानावर उतरण्याची संधी मिळाली नाही. आपण सुमारे 30 मिनिटे खेळणार असल्याचे आश्वासन मिळाले होते, असा त्याचा दावा आहे. प्रत्यक्षात संधी न मिळाल्याने आणि नंतरच्या स्पष्टीकरणावरून मतभेद वाढल्याने त्याने डेन्मार्कविरुद्धच्या सामन्यापूर्वी राष्ट्रीय संघाचे शिबीर सोडले. या निर्णयाने संघशिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला.

…पण कारवाई टळली नाही

वादानंतर रोनाल्डोने सहकारी आणि चाहत्यांची माफी मागितली. शिबीर सोडण्याचा निर्णय योग्य नव्हता, हे मान्य करत त्याने संभाव्य शिक्षेला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. त्याचवेळी प्रशिक्षकांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे हा संघर्ष केवळ खेळण्याच्या संधीपुरता मर्यादित न राहता परस्पर विश्वासाचा मुद्दा बनला आहे.

सहा महिन्यांच्या बंदीचे सावट

पोर्तुगालच्या शिस्तविषयक नियमांनुसार, राष्ट्रीय संघाच्या उपक्रमातून विनाकारण माघार घेतल्याचे सिद्ध झाल्यास एक ते सहा महिन्यांची बंदी आणि दंड होऊ शकतो. महासंघाने प्रकरण तातडीच्या चौकशीसाठी पाठवले आहे. त्यामुळे रोनाल्डोसमोर आता गोल करण्यापेक्षा शिस्तभंगाच्या आरोपांतून बाहेर पडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. निर्णयानंतरच त्याच्या बंदीचा कालावधी स्पष्ट होईल.