सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरती पालवेने दिला 330 निराधारांना आधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 >> राजेश देशमाने

चिखली तालुक्यातील पचमखेड सपकाळ पेधील सेवा संकल्प प्रतिष्वानच्या माध्यमातून उरती नंदकुमार पालवे हिने ३३० निराधारांना आधार दिला आहे. मनोकरण, बौद्धिक दिम्यांग, गतिमंद, एचआयव्हीचास्ति आणि गरजू माता-भगिनी निवारा, अत्र, वैद्यकीय उपचार आणि सन्मानाचे जीवन मिळवून देण्यामराठी त्या सदैव कार्यरत आहेत. चर निराधार व्यक्तीपासून सुख इराणलेल्या या सेवाकार्याधा कितार आज ३३० निवासी अलीपर्यंत झाला असून सैलानी यानंतर रस्त्यावर भटकणाऱ्या आणि निर अवस्थेत जीवन जगणाऱ्या व्यक्तींना मदत करण्याच्या उद्देशाने आरती पालने यांचे सेवाकार्य सुरू आहे.

चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरती नंदकुमार पालवे निराधार मनोरुग्ण, बौद्धिक दिव्यांग, गतिमंद, एचआयव्हीबाधित आणि गरजू माता-भगिनी व बांधवांना निवारा, अन्न, वैद्यकीय उपचार आणि सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत. चार निराधार व्यक्तींपासून सुरू झालेल्या या सेवाकार्याचा विस्तार आज सुमारे ३३० निवासी व्यक्तींपर्यंत झाला आहे. सैलानी यात्रेनंतर रस्त्यावर भटकणार्‍या आणि निराधार अवस्थेत जीवन जगणार्‍या व्यक्तींना मदत करण्याच्या उद्देशाने आरती पालवे यांनी सेवाकार्य सुरू केले.

 चिखली आणि बुलढाणा परिसरात अशा व्यक्तींना अन्न व उपचार उपलब्ध करून देण्यापासून या उपक्रमाची सुरुवात झाली. २०११ मध्ये आरती आणि नंदकुमार पालवे यांच्या विवाहानंतर आरती यांच्या वडिलांनी दिलेल्या दोन गुंठे जागेवर टीनशेड उभारून चार निराधार व्यक्तींसाठी निवासी प्रकल्प सुरू करण्यात आला. ७ ऑक्टोबर २०१२ रोजी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते सेवा संकल्पचे औपचारिक उद्घाटन झाले. आरती यांनी माध्यमिक शिक्षिकेची नोकरी सोडून समाजकार्य विषयातील एमएसडब्ल्यूचे शिक्षण पूर्ण केले आणि पूर्णवेळ या कार्याला वाहून घेतले. २०१८ मध्ये सेवा संकल्प प्रतिष्ठानची अधिकृत नोंदणी करण्यात आली. विविध दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि सहकार्‍यांच्या मदतीतून संस्थेच्या निवासी सुविधांचा विस्तार झाला. संस्थेच्या माहितीनुसार, येथे भारतातील १९ राज्यांमधील सुमारे ३३० माता-भगिनी व बांधव निवासी आहेत. त्यांना सुरक्षित निवारा, सकस आहार, स्वच्छता, औषधोपचार आणि दैनंदिन देखभाल उपलब्ध करून दिली जाते.

सुसज्ज रुग्णालयातून मोफत उपचार
निराधार रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी भरतीया परिवाराच्या पुढाकारातून संस्थेत ६० खाटांचे ‘श्रीमती तारादेवी चिमणलालजी भरतीया सामान्य रुग्णालय’ सुरू करण्यात आले. या रुग्णालयात चार ऑपरेशन थिएटर, डायलिसिस युनिट, एक्स-रे युनिट, अपघात कक्ष, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा, अतिदक्षता विभाग आणि प्रसूती विभागासह विविध सुविधा उपलब्ध आहेत. डॉक्टरांची टीम रुग्णांवर उपचार करते. संस्थेतील निराधार व्यक्तींना येथे मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. दीर्घकाळ रस्त्यावर राहिल्यामुळे अनेक व्यक्तींना गंभीर आजार, जखमा आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. अशा रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी वैद्यकीय सेवा आणि निवासी देखभाल यांचा समन्वय साधला जातो. संस्थेतील उपचारांचा लाभ परिसरातील गरजू रुग्णांनाही होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सेवा संकल्पचे कार्य केवळ निवारा आणि संगोपनापुरते मर्यादित न राहता आरोग्यसेवेच्या क्षेत्रातही विस्तारले आहे.

रोजगारातून स्वावलंबनाचा प्रयत्न
मानसिक आजारातून सावरणार्‍या व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी संस्थेने विविध कुटीर उद्योग सुरू केले आहेत. पळसाच्या पानांपासून द्रोण व पत्रावळी, सांब्राणी धूपकप, पायपुसणी, हेअरबँड, स्क्रंचीज आणि इतर वस्तू तयार केल्या जातात. या उद्योगांमध्ये सुमारे ६० व्यक्तींना काम करण्याची संधी मिळते. तयार वस्तूंची विक्री करण्यासाठी निवासी व्यक्ती स्वतः स्टॉल चालवतात. गतवर्षी चिखली आणि बुलढाणा येथे त्यांनी सुमारे ६० हजार रुपयांच्या गणेशमूर्तींची विक्री केली. या उपक्रमातून त्यांना रोजगारासोबत व्यवहारज्ञान आणि आत्मविश्वासही मिळत आहे. संस्थेचा उद्देश संबंधित व्यक्तींना केवळ काम देणे नसून त्यांच्या क्षमतेनुसार काम शिकवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. तयार वस्तूंच्या विक्रीतून मिळणार्‍या उत्पन्नाचा काही हिस्सा त्यांना दिला जातो. स्वतःच्या कमाईतून गरजेच्या वस्तू खरेदी करता याव्यात, बाजारपेठेत व्यवहार करता यावेत आणि इतरांप्रमाणे स्वतंत्रपणे जगण्याचा अनुभव मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातात. अशा उपक्रमांमुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होत आहे.

‘भारतीय’ आडनावातून अधिकृत ओळख
स्वतःची ओळख सांगता न येणार्‍या व्यक्तींना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठीही संस्थेने प्रयत्न केले आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या सहकार्याने ४८ व्यक्तींचे ‘भारतीय’ हे आडनाव लावून आधार कार्ड तयार करण्यात आल्याची माहिती संस्थेने दिली आहे. उद्योगांतून मिळणार्‍या उत्पन्नातील काही हिस्सा संबंधित व्यक्तींना दिला जातो. त्यांना बाजारपेठेत खरेदीसाठी नेऊन आर्थिक व्यवहार करण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाते. ओळखपत्रामुळे संबंधित व्यक्तींना शासकीय आणि आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या प्रक्रियेत मदत होऊ शकते. अनेकांना स्वतःचे नाव, गाव किंवा कुटुंबीयांची माहिती सांगता येत नसल्यामुळे त्यांची ओळख निश्चित करणे हे मोठे आव्हान असते. अशा व्यक्तींचे संगोपन करताना त्यांच्या वैयक्तिक गरजा, सन्मान आणि स्वावलंबन यांना प्राधान्य देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

आर्थिक अडचणी आणि मदतीची गरज
संस्थेसमोर आर्थिक अडचणी आणि प्रशिक्षित कर्मचार्‍यांची कमतरता ही प्रमुख आव्हाने आहेत. संस्थेच्या माहितीनुसार, निवासी व्यक्तींच्या भोजन, औषधे, डायपर आाfण उपचारांवर दररोज सुमारे एक लाख रुपये खर्च होतात. नियमित शासकीय अनुदान उपलब्ध नसल्यामुळे संस्थेचे काम प्रामुख्याने लोकसहभाग आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीवर चालते. सध्या सुमारे ३० गंभीर आजारी रुग्ण रुग्णालयात दाखल असल्याचे संस्थेने नमूद केले आहे. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या व्यक्तींची स्वच्छता, आरोग्य, मानसिक स्थिती आणि दैनंदिन गरजा सांभाळण्यासाठी सातत्याने मनुष्यबळ आणि आर्थिक संसाधने आवश्यक असतात. औषधोपचारांबरोबरच आहार, कपडे, स्वच्छतेचे साहित्य आणि वैद्यकीय उपकरणांवरही खर्च होतो. वाढती रुग्णसंख्या आणि उपचारांचा खर्च लक्षात घेता समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या कार्यातून अधोरेखित होते.

५०० क्षमतेचे ‘ज्ञानेश्वरी अवेदना केंद्र’
निराधार महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि संगोपनासाठी ५०० रुग्णांची क्षमता असलेले ‘ज्ञानेश्वरी अवेदना केंद्र’ उभारण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. एक दिवसाच्या बालिकेपासून ते शंभर वर्षांच्या वृद्ध महिलेपर्यंत विविध वयोगटांतील महिलांना सुरक्षित निवारा, उपचार आणि सन्मान मिळवून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संस्थेला समाजाच्या सहकार्याची आवश्यकता आहे.

शिक्षण, सेवाभाव आणि माणुसकीचा वसा
आरती नंदकुमार पालवे यांनी बी.एस्सी., बी.एड., एम.एसडब्ल्यू. आणि पीजीडीएमएलटी असे शिक्षण घेतले असून त्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. निराधारांना केवळ निवारा आणि अन्न देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना उपचार, रोजगार, स्वतंत्र ओळख आणि सन्मानाचे जीवन मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या कार्यात त्यांचे पती नंदकुमार पालवे, संस्थेतील कर्मचारी, सहकारी आणि दानशूर व्यक्ती यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. रस्त्यावर निराधार अवस्थेत सापडलेल्या व्यक्तींना सुरक्षित वातावरण देणे, त्यांच्यावर उपचार करणे आणि त्यांना पुन्हा स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करणे हे दीर्घकालीन व आव्हानात्मक काम आहे. अशा व्यक्तींकडे दया किंवा तिरस्काराने नव्हे, तर माणूस म्हणून पाहिले जावे, त्यांचे हक्क आणि सन्मान जपले जावेत, हा सेवा संकल्पच्या कार्यामागील मूलभूत विचार आहे. आरती पालवे यांची ही सेवायात्रा समाजातील संवेदनशीलता आणि सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित करते.