
मतदारांच्या याद्यांच्या एसआयआरबाबत सुरू असलेल्या तीव्र वादाच्या पार्श्वभूमीवर, केरळ विधानसभेने सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारा प्रस्ताव पारित केला. कदाचित देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रस्ताव असून, तो मुख्यमंत्री व्ही. डी. सथीसन यांनी मांडला.
‘मतदानाचा हक्क हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांना धक्का लावण्याची कोणत्याही संस्थेला परवानगी दिली जाऊ नये. आमची भूमिका स्पष्ट आहे. मतदानाचा हक्क सुरक्षित राहिलाच पाहिजे. संविधानाचा सन्मान राखला गेला पाहिजे. लोकशाही टिकली पाहिजे. केरळ मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी ठामपणे उभे आहे’, असे सथीसन यांनी नंतर एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले.
‘केरळने इतिहास रचला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी करणारा प्रस्ताव केरळ विधानसभेने पहिल्यांदाच संमत केला आहे. आपल्या निवडणूक प्रक्रियेची सचोटी ही तडजोड करण्याजोगी नाही’, असे त्यांनी पुढे नमूद केले.
यापूर्वी प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मोठ्या संख्येने मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, लोकशाही मूल्यांचे हे उघड उल्लंघन आहे.
यामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला की, मतदार यादीच्या पुनरावृत्तीबाबत, पात्र मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याबाबत आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे, ज्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल सुधारणेतील (एसआयआर) कथित अनियमितता दूर करणे आणि चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलेल्या सर्व पात्र मतदारांचे मतदानाचे हक्क तात्काळ बहाल करणे, या प्रस्तावाद्वारे मागण्यात आले.
तसेच, एसआयआरबाबत गंभीर आरोप झाल्यामुळे सीईसींची निष्पक्षता संशयाच्या घेऱ्यात आली आहे, असे सांगत त्यांना पदावरून हटवण्याची कारवाई सुरू करण्याची मागणीही यात करण्यात आली. संस्थेचे स्वातंत्र्य आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी, पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि देशाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीची पुनर्रचना करण्याची मागणीही करण्यात आली.
प्रस्ताव मांडल्यानंतर, भाजपचे विधानसभेतील पक्षनेते बी. बी. गोपाकुमार यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांची निवडणूक कायदेशीर होती का, याबद्दल स्पष्टीकरण मागितले. सुधारित प्रस्ताव सभागृहात हात वर करून संमत करण्यात आला.

























































