महसुल प्रशासन व पोलिसांची आजपर्यंतची मोठी कारवाई, वाळू माफियाविरुद्ध विशेष मोहीम, १३ कोटी १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेडच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्या संयुक्त पथकाने काल दिवसभर मुदखेड, उस्माननगर, ग्रामीण पोलीस ठाणे, नायगाव, लिंबगाव, धर्माबाद आदी ठिकाणी गोदावरी घाटावर कारवाई करत १३ कोटी १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त व काही माल नष्ट करुन धडाकेबाज कारवाई केली. याबाबत अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

वाळू घाटांचे लिलाव अद्याप प्रलंबित असताना गोदावरी नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवून रेतीचे अवैध उत्खनन करुन बेकायदेशीररित्या वाळू उपसा केला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सदरची कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात हि सर्वात मोठी कारवाई मानली जाते. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्या नेतृत्वाखाली सदरची कारवाई करण्यात आली. काल सकाळपासूनच त्याबाबतचे नियोजन करुन सहा पोलीस उपअधीक्षकांसह व संबंधित महसूल यंत्रणेसह हि पथके पोहंचली. सुरुवातीला मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि कारवाई झाली. त्यात १३ मोठ्या बोटी, पाच छोट्या बोटी, ७५ ब्रास रेती असा ५ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौडेगाव, कामळज, येळी येथे देखील धडक कारवाई करत १४ बोटी जप्त करण्यात आल्या. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मार्वंâड शिवार, विष्णूपुरी शिवार, पिंपळगाव निमजी शिवार, वाहेगाव शिवार, कल्हाळ, भनगी या गोदाकाठच्या भागात पाच मोठ्या बोटी, दोन छोट्या बोटी, १०३ तराफे असा २ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुदखेड रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोलपंपासमोर दोन हायवामधून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याचे दिसून आल्यानंतर त्या हायवासह रेती असा ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यातील वाहन चालक संदीप गजभारे, संदीप कदम, भिमराव मोरे, साहेबराव पुयड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. असर्जन पुलाजवळ ३ लाख ५ रुपयाचा ऐवज व वाहन पोलिसांनी जप्त करुन देविदास वैद्य या चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला. नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदेड-नायगाव रोडवर नाकाबंदी करुन दोन हायवा व रेती असा २० लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक दत्ता राठोड व ज्ञानेश्वर पांडुरणे यांच्याविरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत बापू बिअर शॉपीसमोर एका हायवामधून अवैधरित्या रेती नेली जात होती. सदरच्या पथकाने सदर हायवा जप्त करुन आकाश भरकडे व वैभव दळवे या दोन चालकांना अटक केली. तेथे २० लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू उपसा करणारे यंत्रच स्फोट घडवून नष्ट करण्यात आले. सदरची कारवाई बोरगाव तेलंग येथील जुन्या गावठाणात करण्यात आली. याठिकाणी पाच इंजिन, लोखंडी बोट व पाच तराफे असा ३१ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी अर्जुन क्षीरसागर, करण क्षीरसागर, माधव गुबरे यांच्याविरुध्द लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहरु चौक येथे ट्रॅक्टर व ट्रॉलीमधून अवैधरित्या रेतीची वाहतूक केली जात होती. तेथील आरोपी प्रकाश भेरजे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन दोन लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अशा प्रकारे एकूण २७ मोठ्या बोटी, १३ छोट्या बोटी, पाच इंजिन, १०८ तराफे, चार हायवा, एक टेम्पो, एक ट्रॅक्टर, एक पोकलेन व ५५५ ब्रास रेती जप्त करण्यात आली. लोखंडी बोट व इंजिन अत्यंत अवजड असल्याने त्यांना नदीपात्राबाहेर काढणे शक्य नसल्याने जिलेटीनचा स्फोट घडवून ती नष्ट करण्यात आली. असा १३ कोटी १२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांसह या मोहिमेत पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजने, श्याम पानेगावकर, प्रशांत शिंदे, सुशिल जुमडे, किरण पोपळघट, वैभव पडवळ व त्यांच्या सहकार्‍यांनी यशस्वीरित्या पार पडली.