WPL 2027 – मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीला नवीन धार! अमेरिकन वादळाची संघात एन्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा डाव खेळला आहे. WPL 2027 साठी संघाने आतापासूनच मोर्चेबांधनी सुरू केल्याच पाहायला मिळत आहे. अमेरिकेची वेगवान गोलंदाज नॉरिस हिला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात सामिल करून घेतलं आहे. यूपी वॉरियर्सकडून झालेला हा ट्रेड यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे.

तारा नॉरिस तिच्या सध्याच्या 10 लाख रुपयांच्या फीमध्येच मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. तारा नॉरिसच्या WPL प्रवासावर नजर टाकल्याच तिच्या कर्तृत्वाची छाप दिसून येते. आक्रमक खेळाडू आणि घातक गोलंदाजीसाठी तारा नॉरिस ओळखळी जाते. विशेष म्हणजे तारा नॉरिस ही डब्ल्यूपीएलच्या पहिल्या लिलावात कोणत्याही फ्रेंचायझीद्वारे निवडली जाणारी असोसिएट देशांची पहिली खेळाडू ठरली होती. पहिल्याच हंगामात तिने मातब्बर फलंदाजांना मोठा हादरा दिला. एकाच सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम सुद्धा तिने करून दाखवला आणि WPL मध्ये एकाच सामन्यात 5 विकेट घेणारी पहिली गोलंदाज बनली होती. दिल्ली कॅपिटल्सनंतर युपी वॉरियर्स आणि आता मुंबईकडून ती आगामी हंगामात मैदानात उतरेल.

तारा नॉरिसच्या डब्ल्यूपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिने आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये 12.71 च्या उत्कृष्ट सरासरीने 7 बळी घेतले आहेत, ज्यामध्ये 29 धावांत 5 बळी ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. विशेष म्हणजे तिने हे सर्व सामने दिल्ली कॅपिटल्ससाठीच खेळले असून यूपी वॉरियर्सकडून तिला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचे प्रतिनिधित्व करताना ताराने 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 26 च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या आहेत आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 21 फलंदाजांना तंबूत धाडलं आहे.