सामना अग्रलेख – दुष्काळाची चेष्टा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱ्यांना पाच हजार आणि अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपयांची मदत ‘दिवाळी भेट’ म्हणून जाहीर करून फडणवीस सरकारने आपल्या अकलेचे दिवाळे काढले आहे. शेतकऱ्यांना द्यायच्या एकूण पैशांतलाच एक पाच हजारांचा तुकडा ‘ऍडव्हान्स’ म्हणून सरकारने बळीराजाच्या तोंडावर फेकला आहे. देवाभाऊ, आजच्या महागाईच्या वणव्यात दोन–पाच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी होऊ शकेल? मोदींच्या सेवासंकल्प अभियानासाठी प्रत्येक जिह्याला 50 लाखांचे ‘डबोले’ देणारे हे सरकार शेतकरी आणि अंगणवाडी सेविकांना मात्र दिवाळीसाठी फक्त पाच आणि दोन हजार रुपये देत आहे. ही मदत नाही. त्यांची थट्टा आहे. दुष्काळाची चेष्टा आहे!

 गरीबांच्या जखमांवर मीठ कसे चोळायचे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच शिकावे. दुष्काळाचा वणवा पेटला आहे. माणसे, जनावरांच्या जिवांची होरपळ सुरू आहे आणि सरकार दुष्काळ निवारणावर बैठका आणि घोषणांचा कोरडा पाऊस पाडत आहे. पुन्हा मदतीचा हातभार वितभर आणि त्याची प्रसिद्धी हातभर, असा सर्व प्रकार चालला आहे. श्री. फडणवीस यांनी दुष्काळग्रस्तांवर मोठीच मेहेरबानी केली आहे. त्यांचे सरकार म्हणे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजारांची मदत करणार आहे. या भरघोस मदतीचा डांगोरा असा पिटला जात आहे की, लोकांना हा पाच हजारांचा आकडा पाच लाख वाटावा. या पाच हजारांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाची बहार येईल, शेतकरी कुटुंब खूश होईल व त्यांची दिवाळी गोडाची होईल. सवा कोटी शेतकऱ्यांना या पाच हजारी मदतीचा लाभ होईल, असे फडणवीस व त्यांच्या लोकांना वाटत असेल तर त्यांना ग्रामीण महाराष्ट्राच्या उद्ध्वस्त शेतकरी बांधवांची स्थिती माहीत नाही. पाण्याची टंचाई आताच सुरू झाली आहे. महागाईचा भडका पेटला आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. किडुकमिडुक विकून, गहाण ठेवून त्याने पेरणी केली ती जळून गेली. या दुष्काळामुळे त्याच्या

खिशाला भोके

पडली आहेत. त्यामुळे पाच हजारांची मदत म्हणजे दुष्काळाची चेष्टा व शेतकऱ्यांची थट्टा आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून कपडालत्त्यापर्यंत सर्वच गोष्टींचे भाव रोजच वाढत आहेत. अशा परिस्थितीत सरकारच्या या पाच हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी गोड आणि आनंदी कशी होणार आहे? फक्त दिवाळीच्या फराळासाठी लागणारा किराणा माल घ्यायचा म्हटला तरी तो यात येणार नाही. जर शेतकऱ्यांच्या घरात गोडधोड होऊ शकणार नसेल, निदान त्यांच्या मुला-बाळांना तो नवे कपडे घेऊ शकणार नसेल तर हे सरकार कुठल्या तोंडाने ‘शेतकऱ्यांची दिवाळी आनंदी केली होती’ अशी फुशारकी मारीत आहे? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची अवस्था यावेळी कधी नव्हती एवढी दयनीय झाली आहे. राज्यातील 300 पेक्षा जास्त तालुके सरकारने दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. या सर्व तालुक्यांतील प्रत्येक शेतकरी जगण्याचा संघर्ष करीत आहे. खरीप नाही, रब्बी नाही. त्यामुळे पुढील सात-आठ महिने बायका-पोरांचे पोट कसे भरायचे, इतर खर्च कसा करायचा, जनावरांना कसे जगवायचे असे असंख्य प्रश्न बळीराजाला भेडसावत आहेत. त्यांची उत्तरे त्याला सरकारकडून अपेक्षित आहेत. मात्र हे सरकार फक्त

घोषणांच्या वाफा

सोडत आहे. पाच हजार रुपयांची ‘दिवाळी भेट’ जाहीर करून शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याचा आव आणत आहे. पुन्हा सरकार ज्याला मदत म्हणत आहे तो म्हणे ‘ऍडव्हान्स’ आहे. म्हणजे शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून जी मदत मिळणार आहे, त्यातीलच पाच हजार रुपये आता राज्य सरकारने दिले आहेत. याला ‘मदत’ कसे म्हणता येईल? जे पैसे द्यायचेच आहेत त्यातील एक भाग आधी द्यायचा, त्याला मदतीचा मुलामा द्यायचा आणि आपण केंद्राकडून निधी येण्याची वाट न पाहता बळीराजाची दिवाळी गोड केली म्हणून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. बळीराजाची ही अशी थट्टा तर तिकडे अंगणवाडी सेविका, मदतनीस वगैरेंचीही सरकारने मस्करीच केली आहे. दिवाळी भेट म्हणून त्यांना ‘दोन हजार’ रुपये देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना पाच हजार आणि अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपयांची मदत ‘दिवाळी भेट’ म्हणून जाहीर करून फडणवीस सरकारने आपल्या अकलेचे दिवाळे काढले आहे. शेतकऱ्यांना द्यायच्या एकूण पैशांतलाच एक पाच हजारांचा तुकडा ‘ऍडव्हान्स’ म्हणून सरकारने बळीराजाच्या तोंडावर फेकला आहे. देवाभाऊ, आजच्या महागाईच्या वणव्यात दोन-पाच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी होऊ शकेल? मोदींच्या सेवासंकल्प अभियानासाठी प्रत्येक जिह्याला 50 लाखांचे ‘डबोले’ देणारे हे सरकार शेतकरी आणि अंगणवाडी सेविकांना मात्र दिवाळीसाठी फक्त पाच आणि दोन हजार रुपये देत आहे. ही मदत नाही. त्यांची थट्टा आहे. दुष्काळाची चेष्टा आहे!