
महापालिकेत प्रशासकाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात सुमारे 2.44 लाख कोटींच्या प्रकल्पांची आर्थिक बांधिलकी स्वीकारली गेलेली असताना, दुसरीकडे पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये गेल्या पाच वर्षांत 13,785 कोटींची मोठी घट झाली आहे. याप्रकरणी महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत, काँग्रेसने महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर तातडीने ‘श्वेतपत्रिका’ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे पालिकेतील गटनेते अश्रफ आझमी यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून सविस्तर हिशेबाची मागणी केली असून, महापौरांनी हस्तक्षेप करून विशेष अधिवेशन बोलवावे, अशी विनंतीही केली. आझमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, सिमेंट काँक्रीट रस्ते, सात सांडपाणी प्रक्रिया पेंद्र आणि जल बोगदे अशा 2.44 लाख कोटींच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
चालू आर्थिक वर्षात पंत्राटदारांना 8,000 कोटी देणे अपेक्षित आहे, तर पुढील 7 ते 8 वर्षे दरवर्षी तब्बल 28,000 कोटींची देयके द्यावी लागणार आहेत. ही देयके भागवण्यासाठी निधी कुठून उपलब्ध होणार, याचे प्रकल्पनिहाय व वर्षनिहाय वेळापत्रक प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.
फेब्रुवारी 2026 मध्ये 81,449 कोटी असलेली एफडीची रक्कम आठ महिन्यांत घटून 77,905 कोटींवर (3,544 कोटींची घट) आली आहे. 2021 मध्ये पालिकेकडे 91,690 कोटींच्या ठेवी होत्या. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत एफडीमध्ये 13,785 कोटींची घट झाली आहे.



























































