
मुंबई उपनगरातील दहिसर गावठाण, कांदरपाडा गावठाण-दहिसर आणि कांदरपाडा गावठाण-एक्सर या तीन नवीन कोळीवाड्यांचे सीमांकन केले जाणार आहे. खारदांडा, जुहू कोळीवाडा, जुहू मोरागाव कोळीवाडा, मढ आणि वर्सोवा या पाच कोळीवाड्य़ांच्या आधी झालेल्या सीमांकनाव्यतिरिक्त उर्वरित क्षेत्राच्या हद्दीही निश्चित केल्या जाणार आहेत. कोकण विभागाच्या भूमी अभिलेख उपसंचालकांच्या नियंत्रणाखालील यासाठी समिती नेमण्यात आली असून समितीने तीन महिन्यांच्या आत शिफारसींसह अहवाल द्यावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत. मुंबई उपनगरातील एकूण 29 कोळीवाडय़ांपैकी 23 कोळीवाडय़ांचे सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण झाले आहे.
सात कोळीवाडय़ांचे सीमांकन प्रलंबित
मुंबई शहरातील सात प्रमुख कोळीवाडय़ांच्या सीमांकनाचा प्रश्नही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शिवडी, सायन, कुलाबा, माहीम, मांडवी-प्रिन्सेस डॉक, वरळी आणि कफ परेड या सात कोळीवाडय़ांच्या सीमांकनासाठी राज्य शासनाने यापूर्वी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीला संबंधित सीमांकनाबाबत शिफारसी सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.



























































