
हिंदुस्थानातील तळागाळातील फुटबॉलच्या विकासासाठी प्रीमियर लीगने मुंबईत ‘नेक्स्टजेन कोच’ कार्यक्रमाची दुसरी आवृत्ती आयोजित केली. १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान कूपरेज फुटबॉल मैदानावर पार पडलेल्या या चार दिवसीय कार्यक्रमात ऑस्कर फाउंडेशनच्या ३४ प्रशिक्षकांनी सहभाग घेतला.
प्रीमियर लीगच्या आंतरराष्ट्रीय समुदाय प्रशिक्षकांनी हिंदुस्थानी प्रशिक्षक प्रशिक्षकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबवला. यापूर्वी मे २०२६ मध्ये गोव्यात या उपक्रमाची पहिली आवृत्ती पार पडली होती. स्थानिक प्रशिक्षकांचे कौशल्य वाढवणे, त्यांना आधुनिक प्रशिक्षण पद्धतींची माहिती देणे आणि मुलांना सुरक्षित, सर्वसमावेशक व आनंददायी वातावरणात फुटबॉल शिकवण्यासाठी सक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमांतर्गत वर्गातील सत्रांसह मैदानावर प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपानिमित्त आयोजित ‘नेक्स्टजेन फुटबॉल फेस्टिव्हल’मध्ये ऑस्कर फाउंडेशनच्या १० ते १४ वयोगटातील ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना फुटबॉलचे धडे दिले.
प्रीमियर लीग इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ऋषिकेश शेंडे यांनी सांगितले की, स्थानिक प्रशिक्षकांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे हिंदुस्थानातील तरुण खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळण्यास मदत होईल. या कार्यक्रमाला ब्रिटनचे व्यापार आणि व्यवसाय राज्यमंत्री जोनाथन रेनॉल्ड्स यांच्यासह ग्रेट नॉर्थच्या शिष्टमंडळातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. हिंदुस्थानातील समुदाय फुटबॉल विकासासाठी प्रीमियर लीगने आतापर्यंत १८ राज्यांतील १ लाख ६४ हजारांहून अधिक तरुणांना लाभ मिळवून दिला असून, ७,५०० हून अधिक प्रशिक्षक, पंच आणि शिक्षणतज्ज्ञांना पाठबळ दिले आहे.





























































