
अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील बेंड येथील सिल्व्हर रेल एलिमेंटरी स्कूलमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, या भीषण हल्ल्यात तीन चिमुरड्या मुलांसह पाच जण जागीच ठार झाले आहेत, तर संशयित हल्लेखोरही मृतांमध्ये सामील आहे. बालवाडी ते पाचवीपर्यंतच्या वर्गांत शिक्षण देणाऱ्या या शाळेत गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत संपूर्ण परिसर बंद करुन बचाव पथकांनी तातडीने सूत्रे हाती घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, हा संशयित हल्लेखोर अवघ्या 16 वर्षांचा एक मुलगा होता. पोलिसांच्या घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच त्याला गोळी लागली होती, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र, या संशयितावर नेमकी गोळी कोणी झाडली याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एखाद्या धाडसी व्यक्तीनेच त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला पोलिसांना एका गाडीवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी अमेरिकेची केंद्रीय तपास यंत्रणा ‘एफबीआय’ (FBI) स्थानिक पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करत आहे. एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी ‘एक्स’वर माहिती देताना सांगितले की, एजन्सीचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आवश्यक ती सर्व संसाधने आणि मदत पुरवली जाईल.
ज्या सिल्व्हर रेल प्राथमिक शाळेत ही दुर्घटना घडली, तिथे साधारणपणे 5 ते 11 वयोगटातील अंदाजे 450 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि सुमारे 40 कर्मचारी कार्यरत आहेत. या घटनेमुळे ओरेगॉनसह संपूर्ण अमेरिकेत भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.





























































