फसवणूक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विरारमध्ये महिलेने उचलले टोकाचे पाऊल; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालिका, वेब सिरीज आणि ऑनलाइन जाहिरातींमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका 37 वर्षीय महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढण्यात आले. हे फोटो व व्हिडिओ नातेवाईक, मित्रमंडळी तसेच सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याने संबंधित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना विरारमध्ये उघडकीस आली आहे. निलिनी नामजोशी असे मृत महिलेचे नाव असून, योगेश म्हापणकर उर्फ सौरभ पत्की असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मालिका, वेब सिरीज आणि ऑनलाइन जाहिरातींमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे फोटो व व्हिडिओ महिलेच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना तसेच सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिचा मानसिक छळ केल्याचे समोर आले आहे. या त्रासाला आणि फसवणुकीला कंटाळून महिलेने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले.

या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी माहिती दिली.