
रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी, व्हिडिओ किंवा सोशल मीडिया रील्स पाहून इतर प्रवाशांना त्रास देणाऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. मोबाईलचा स्पीकर वापरून ऑडिओ ऐकणे, मोठ्या आवाजात फोनवर बोलणे आणि मोठ्या आवाजात गाणी लावणे टाळण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे. त्याऐवजी इअरफोन वापरावेत आणि फोनवर बोलताना हळू आवाजात बोलावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, दक्षिण रेल्वेने आपल्या विभागांना या नियमांबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर उद्घोषणा करण्यासह सूचना फलक लावण्यास सांगण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे अधिकार तिकीट तपासनीसांनाही देण्यात आले आहेत.
वृत्तानुसार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना १,००० रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो आणि त्यांना रेल्वेतून उतरवले जाऊ शकते. वारंवार त्रास देण्याच्या प्रकरणांत ५,००० रुपयांपर्यंत दंड किंवा ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद लागू होऊ शकते, असेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
एसी डब्यांमध्ये मोठ्या आवाजाचा सर्वाधिक त्रास
रेल्वे प्रवासात अनेक प्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात पिक्चर, सीरीज आणि सोशल मीडिया रील्स पाहतात. काही प्रवासी लहान मुलांना इअरफोन न वापरता मोठ्या आवाजात कार्टून दाखवतात. त्यामुळे संपूर्ण डब्यातील इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.
विशेषतः एसी डब्यांमध्ये अशा प्रकारांचा अधिक त्रास होतो. या डब्यांमध्ये तुलनेने शांत वातावरण असल्यामुळे मोठ्या आवाजात फोनवर बोलणे, व्हिडिओ पाहणे किंवा रिंगटोन वाजणे इतरांच्या लक्षात लगेच येते. रात्री उशिरा अशा प्रकारांमुळे प्रवाशांच्या झोपेतही व्यत्यय येतो.
पी. राम कुमार या प्रवाशाने सांगितले की, एसी डब्यांमध्ये मोठ्या आवाजात बोलणे आणि मोबाईलवरील ऑडिओ ऐकवणे अधिक त्रासदायक ठरते. प्रत्येक वेळी संबंधित प्रवाशाला तक्रार करणे शक्य होत नाही. विशेषतः रात्री उशिरा असा त्रास सुरू झाल्यास तक्रार करणे आणखी कठीण होते.
कोझिकोड ते तिरुवनंतपुरमदरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्या श्रीजा हरी यांनीही असा अनुभव सांगितला. वंदे भारत एक्स्प्रेसच्या एका डब्यात वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले ३ प्रवासी मोबाईल स्पीकरवर वापरत असल्याचे त्यांनी पाहिले होते. याबाबत त्यांनी प्रवासादरम्यान तिकीट तपासनीसाकडे (TTE) तक्रार केली होती.
२०१२ मध्येही रेल्वे बोर्डाने दिले होते निर्देश
रेल्वे प्रवासादरम्यान मोठ्या आवाजात मोबाईल वापरण्याचा प्रश्न यापूर्वीही उपस्थित झाला होता. २०१२ मध्ये रेल्वे बोर्डाने रेल्वेच्या विविध विभागांना अशा प्रकारांना आळा घालण्यास सांगितले होते. मात्र, अनेक ठिकाणी या उपायांचा फारसा परिणाम झाला नाही.
आता यंदा लागू झालेल्या जनविश्वास कायद्यातील बदलांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे, असे ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
प्रवाशांनी कठोर कारवाईच्या भूमिकेचे स्वागत केले असले, तरी नियमांची सातत्याने अंमलबजावणी झाली आणि प्रवाशांमध्ये योग्य जनजागृती करण्यात आली, तरच दंडाचा प्रभाव दिसून येईल, असे मतही व्यक्त केले जात आहे.
रेल्वेत मोठ्या आवाजाचा त्रास झाल्यास तक्रार कशी कराल?
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना इतरांचा विचार करण्याचे आवाहन केले आहे.
– मोबाईलवर गाणी, व्हिडिओ किंवा रील्स पाहताना इअरफोनचा वापर करा.
– फोनवर शक्यतो कमी वेळ बोला आणि आवाज मर्यादित ठेवा.
– मोठ्या आवाजात रिंगटोन वाजवणे टाळा.
– सहप्रवाशांकडून वारंवार त्रास होत असल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती द्या.
– रेल्वेच्या RailMadad या तक्रार निवारण सेवेच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येते.
रेल्वे प्रवासात प्रत्येक प्रवाशाला शांततेत आणि आरामात प्रवास करता यावा, यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर करताना इतर प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



























































