विज्ञान रंजन – प्लॅस्टिकची अतिसृष्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

साधारण साठ वर्षांपूर्वीची गोष्ट. आज अवघे जग व्यापून दशांगुळे उरलेलं प्लॅस्टिक फारसं कुठे दिसत नव्हतं. घरोघरी अशी काही वस्तू असते याचीसुद्धा कल्पना नव्हती. स्वयंपाकघरातली भांडी म्हणजे ताटं, वाट्या, पेले, डाव, चमचे, टोप (पातेली) आणि धान्य किंवा अन्य वस्तू ठेवण्याचे डबे बहुतेक पितळेचे असत. घागरी-हंडे तांब्याचे. पराती पितळ्याच्याच. त्यातल्या स्वयंपाक करण्याच्या आणि जेवण्याच्या भांडय़ांना जस्ताची ‘कल्हई’ लावली जायची. मोठे डबे पत्र्याचे असायचे. पाण्याच्या बाटल्या आणि विकत मिळणारे डबाबंद पदार्थही ‘गॅल्व्हनाइज्ड’ किंवा आत जस्ताचा मुलामा दिलेल्या पत्र्याचे असत. मोठय़ा वस्तूंची ने-आण करायला कापडी किंवा पंतानाच्या पोत्यासारख्या ज्युट अथवा तागाच्या पिशव्या वापरल्या जायच्या. शिवाय पुठ्ठ्याचे बॉक्स, पत्र्याच्या ट्रंका अशा वस्तू असायच्याच. फर्निचर, आरशांच्या, फोटोंच्या चौकटी लाकडी असत. थोडक्यात ‘प्लॅस्टिक’ नावाचा पदार्थ रोजच्या जीवनात रूळला नव्हता. अगदी इलेक्ट्रिक फ्युजचे मीटरसुद्धा शुभ्र चिनीमातीचे दिसायचे. बाकी पाण्यासाठी, औषधांसाठी काचेच्या बाटल्यांचा उपयोग व्हायचा.

नाही म्हणायला विजेच्या बटनांसाठी किंवा इस्त्रीचं हॅन्डल वगैरे बॅकेलाइटचं असायचं. जुने काळे टेलिफोन हॅण्डसेटही तसेच. खेळणी व बाहुल्या बहुतेक लाकडी, मातीच्या किंवा कापडाच्या असायच्या. कचकडय़ाची (बॅकेलाइट) बाहुली हे अप्रूप वाटायचं, पण सत्तरच्या दशकात अचानक या साऱ्या वस्तू हळूहळू अस्तंगत होऊ लागल्या. स्वयंपाकघरात न काळवडणारे स्टेनलेस्ट स्टीलचे डबे झळकायला लागले. बऱयाच वस्तूंना ‘स्टील’ने व्यापले, तर उरलेल्या कित्येक वस्तू प्लॅस्टिक नावाच्या पदार्थाच्या मिळू लागल्या. वॉशरूममध्ये (तेव्हाचं न्हाणीघर) प्लॅस्टिकच्या रंगीत बादल्या. त्यासुद्धा न गंजणाऱया आणि न फुटणाऱया. त्याचं कौतुकच नव्हे तर चर्चा व्हायची. प्लॅस्टिकच्या ‘पिशवी’मधून दूध मिळणार ही काचेची बाटलीबंद दूध घेणाऱयांसाठी ‘न्यूज’ होती.

या सगळ्या जुन्या वस्तूंवर प्लॅस्टिकचं आक्रमण झालं. स्वस्त, मस्त आणि वजनाला हलपं असल्याने उपयुक्त प्लॅस्टिक संपूर्ण जीवनच व्यापायला लागलं. त्याआधी ओलसर गोष्टी ठेवण्यासाठी मेणकापड किंवा रेक्झिनची मॅट मिळायची. रबराचाही वापर ‘हॉटवॉटर बॅग’साठी व्हायचा, परंतु हे अपवाद. एरवी बहुतेक पदार्थ धातुजन्य किंवा काचेचे, लाकडाचे वगैरे.

प्लॅस्टिकची ही ‘सुनामी’ जगाला थोपवता आलीच नाही. नव्याची नवलाई वाटेपर्यंतच ते सर्वव्यापी झालं. त्याची अक्षरशः प्रतिसृष्टी निर्माण झाली. आता ते ‘अतिसृष्टी’पर्यंत जाऊन पोहोचलंय. माणसाच्या आणि प्राणी, वनस्पतींच्या आरोग्याला त्रास देतंय.

प्लास्टिक (किंवा प्लॅस्टिक) हा शब्द ग्रीक भाषेतील ‘प्लास्टिकोस’ यापासून आला. याचा अर्थ हवा तसा आकार देता येणारी वस्तू. आधुनिक प्लॅस्टिक त्याचंच रूप. त्यामध्ये मूलतः ऑरगॅनिक पॉलिमर असतं. कार्बन अणुंच्या साखळीत ते सापडतं किंवा नायट्रोजन, सल्फरमधून मिळतं. प्लॅस्टिकची रूपं अनेक. बॅकेलाइट, ऑक्रिलिक, पॉलिएस्टर, सिलिकॉन, पॉलियुरेथेनस तसेच हेलोजेनेटेड प्लॅस्टिक. थर्मोप्लॅस्टिकमधून पॉलिथिलेन, पॉलिप्रॉपलिन, पॉलिस्टेरेन इ. बनतात. थर्मोसेट पॉलिमरमधून इपॉक्सी रेझिन बॅकेलाइट घडतं. पूर्वीच्या बॅकेलाइट पह्नची जागा नंतर पॉलिथिलिनने घेतली. फायबर ग्लास, इपॉक्सी लॅमिनेट्स अशा कितीतरी गोष्टी प्लॅस्टिक देत असतं.

1859 मध्ये लंडनमध्ये अलेक्झॅन्डर पार्कस् यांनी सेल्युलोजवर आधारित ‘पार्पेसिन’ बनवले. नंतर 1869 जॉन वेस्टली यांनी त्यात सुधारणा केली. 1907 मध्ये संपूर्ण सिंथेटिक प्लॅस्टिक आलं. दुसऱया महायुद्धाने (1939 ते 45) अनेक नव्या उपयुक्त पदार्थांच्या संशोधनाला गती दिली. त्यात ‘शॉकप्रूफ’ प्लॅस्टिकला महत्त्व आलं. शिवाय लोकांच्या गरजेपोटी अमेरिकेतलं प्लॅस्टिक उत्पादन त्या काळात 300 टक्के वाढलं.

1950 पासून रेडिओच्या कॅबिनेटही प्लॅस्टिकपासून बनायला लागल्या. मेणाच्या जाणी प्लॅस्टिकच्या रेकॉर्डस् आल्या. पुढे स्पूल, पॅसेट, सीडी ते कॉम्प्युटर आणि मेपॅनिकल अभियांत्रिकीमध्येसुद्धा प्लॅस्टिकच्या सुटय़ा भागांचा समावेश होऊ लागला. पंख्याची पाती किंवा आतली दातेरी चक्र प्लॅस्टिकची झाली.

प्लॅस्टिकच्या या ‘अति’सृष्टीचे दुष्परिणाम लवकरच दिसू लागले. सध्या जगात दरवर्षी 4 कोटी 60 लाख टन प्लॅस्टिक तयार होते. 1950 मध्ये हे प्रमाण केवळ 20 लाख टन होतं! जेवढं प्लॅस्टिक तयार होतं, साधारण तेवढंच प्लॅस्टिक ‘वेस्ट’सुद्धा निर्माण होतं. त्यापैकी पाण्याच्या बाटल्या, पातळ प्लॅस्टिकच्या पिशव्या, चमचे, पेले, स्ट्रॉ, कन्टेनर, वेष्टन यांचा ‘कचरा’ भरपूर असतो. हे पारंपरिक प्लॅस्टिक ‘नष्ट’ कसं करायचं हा एक प्रश्नच असतो. ते पाण्यात आणि मातीतही वर्षानुवर्षे तसेच राहतं. त्यामुळे जलस्रोत आणि शेतीला त्याचा त्रास होतो. माणसं, भूचर, जलचर अशा सुमारे 1500 सजीवांवर प्लॅस्टिकच्या कचऱयाचा वाईट परिणाम होतो. प्लॅस्टिक कचऱयामुळे वाहतं पाणी तुंबतं. गुरं चाऱयाबरोबर नकळत ते खाऊ शकतात. यावर उपाय? आहेत, परंतु विलक्षण चिकाटीने आणि निष्ठsने ते अमलात आणावे लागतील. आज हिमालयाच्या उंचीपासून पॅसिफिकच्या तळापर्यंत पोहोचलेलं प्लॅस्टिक ‘आत्म्यानंतरची अमर’ गोष्ट ठरत आहे. त्यावरचे काही उपाय नंतरच्या लेखात.