देश सोडण्याच्या नोटिशीला इम्रान खानचे उच्च न्यायालयात आव्हान; २६ ऑक्टोबरला होणार सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात करण्यात आलेल्या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने बजावलेल्या देश सोडण्याच्या नोटिशीला बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. २८ ऑक्टोबरपूर्वी देश सोडण्याचे आदेश त्याला देण्यात आले असून, त्याच्या या याचिकेवर आता २६ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

अमेरिकेचे नागरिकत्व आणि ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्ड असलेल्या इम्रान खानला १० ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परदेशी नागरिक असूनही राजकीय आंदोलनात सहभाग घेतल्याचा आरोप करत फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसने (FRRO) १४ ऑक्टोबर रोजी त्याला नोटीस पाठवली आणि देश सोडण्याचे आदेश दिले. या नोटीसला अभिनेता इम्रान खान याने उच्च न्यायालयात आव्हान दिले असून यावर आता २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.