मिंधे सरकारकडून पालिकेच्या पैशांची लूट, प्रतिष्ठेची हानी! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

मुंबई महानगरपालिकेत सध्या निवडून आलेले नगरसेवक नसल्यामुळे मिंधे सरकारकडून मुंबईकरांच्या हक्काच्या पैशांची लूट सुरू आहे. भ्रष्टाचारी कारभारामुळे महापालिकेच्या प्रतिष्ठेची हानी होत आहे. शिवाय सवा वर्षाहून अधिक काळ प्रशासकाच्या हाती कारभार असताना तब्बल नऊ वॉर्डमध्ये सहाय्यक आयुक्तच नसल्याने सोयीसुविधांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे गद्दारांनी भ्रष्टाचार करण्यासाठी संबंधित वॉर्डांची जबाबदारी आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांकडे सोपवली असल्याचा घणाघात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. 

मुंबईतील पायाभूत सुविधा आणि पावसाळी नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. वॉर्डांना कुणी वालीच नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. पालिकेच्या 24 वॉर्डपैकी केवळ 15 वॉर्डना पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त आहेत. सहाय्यक आयुक्तांच्या जागी मर्जीतल्या असिस्टंट इंजिनीअरची नेमणूक करून भ्रष्टाचार सुरू आहे. एकीकडे घटनाबाह्य मुख्यमंत्री आपली खुर्ची वाचवण्यासाठी कसरत करीत असल्यामुळे त्यांचे मुंबईच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासन पूर्णपणे कोलमडल्याचे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे नऊ वॉर्ड वाऱ्यावर

पालिकेच्या वॉर्डमधील पर्ह्ट, सी सॅण्डहर्स्ट रोड, पी/दक्षिण गोरेगाव, एल कुर्ला, आर/दक्षिण कांदिवली, आर/उत्तर दहिसर, टी मुलुंड आणि एस भांडुप या वॉर्डना पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त नसल्यामुळे हे वॉर्ड वाऱ्यावर आहेत.