Ahmednagar crime news – शेतीच्या वादातून चिंभळ्यात गोळीबार, एक गंभीर जखमी

शेतीच्या वादातून एकावर सहा गोळ्या झाडल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा येथील हॉटेल पन्हाळा येथे मंगळवारी रात्री घडली. यामध्ये एकजण गंभीर जखमी असून, आरोपी फरार आहे. या घटनेची नोंद बेलवंडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

जयदीप दत्तात्रय सुरमकर (रा. चिंभळा) असे फरार आरोपीचे नाव आहे. तर संतोष ऊर्फ लाला बबन गायकवाड (वय – 30, रा. चिंभळा) असे जखमीचे नाव आहे. गायकवाड यांना उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत सुनील राजू गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

चिंभळा परिसरातील पन्हाळा हॉटेलवर शेतजमिनीच्या वादाबाबत चर्चा चालू असताना आरोपी जयदीप सुरमकर याने पिस्तूल काढून लाला गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार होताच गायकवाड हॉटेलच्या तारेच्या कंपाऊंडवरून मढेवडगावच्या दिशेने पळत सुटले. यावेळी सुरमकर याने लाला यांचा पाठलाग करून त्यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांच्या हात, छाती, कान, पायामध्ये गोळ्या घुसल्या. त्यानंतर घटनास्थळावरून सुरमकर हा पळून गेला. गायकवाड यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

पोलिसांना खबर मिळताच बेलवंडी व श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची बेलवंडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व उपनिरीक्षक मोहन गाजरे करीत आहेत.