महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; सावकाराने शेतकरी कुटुंबावर ट्रॅक्टर घातला! अकोल्यातील भयंकर घटना

मिंधे सरकारच्या राजवटीत महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवून माणसांना चिरडून मारणाऱया आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, भरदिवसा तहसीलदारावर जीवघेणा हल्ला होतोय. अकोल्यातील घटनेने तर कलंकच लावला आहे. शेतजमीन जबरदस्तीने ताब्यात घेण्यास विरोध करणाऱया शेतकरी कुटुंबाला सावकाराकडून ट्रॅक्टरखाली चिरडून मारण्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

अवकाळी व अन्य नैसर्गिक संकटांची मालिका आणि त्यातच शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जगण्यासाठी नाइलाजास्तव शेतकऱयांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. ते कर्ज वेळेवर फेडता येत नसल्याने मग सावकारांकडून शेतकऱयांच्या जमिनी सक्तीने ताब्यात घेण्याचे प्रकार वाढले आहेत.

तेल्हारा तालुक्यातील मनब्दा गावात ही घटना घडली. शेतकरी संदीप गतमने आणि भांबेरी येथील सावकार शेळके यांच्यातील शेतीच्या वादाचे प्रकरण अकोट न्यायालयात सुरू आहे. तरीही सावकाराने गतमने कुटुंबावर हल्ला केला.

गतमने कुटुंबीयांनी त्याला विरोध करताच शेळके आणि त्यांच्यासोबत आलेल्या टोळक्याने गतमने कुटुंबाला मारहाण केली. ते तिथेच थांबले नाहीत तर गतमने कुटुंबावर ट्रॅक्टर घालत सर्वांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न या गुंडांनी केला.

– सावकाराने दमदाटी करत शेतजमीन बळजबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. संदीप यांचे वडील हरिभाऊ गतमने यांच्यावरही शेळकेने धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. कुटुंबातील महिलांनी विरोध केला असता त्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी सावकार शेळकेसह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सावकारांसोबत सेटलमेंट करू नका!

महायुती सरकारच्या काळात अवैध सावकारीने पुन्हा डोके वर काढले असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱयांना त्रास देण्याचा प्रयत्न अवैध सावकारांकडून होत आहे. अपघात-ड्रग्ज प्रकरणातील आरोपी, गुंड, भ्रष्ट अधिकाऱयांना पाठीशी घालणाऱया महायुती सरकारने शेतकऱयांना छळणाऱया सावकारांसोबत तरी ‘सेटलमेंट’ करू नये, अशी तीव्र प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारा आणि मनाचा थरकाप उडवणारा हा प्रसंग असून अवैध सावकारांवर कडक कारवाई करा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.