ऍप आधारित कॅब कारवाईच्या फेऱ्यात; आरटीओने केला 491 कॅबधारकांकडून 20 लाखांचा दंड वसूल

रिक्षा-टॅक्सी चालकांप्रमाणे आता ऍप आधारित कॅबचालकही नियम धाब्यावर बसवून गाडय़ा चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची दखल घेत मुंबईत आरटीओ विभागाने गेल्या नऊ महिन्यांत नियमांचे पालन न करणाऱ्या तब्बल 491 कॅबचालकांविरोधात कारवाई करत 19 लाख 76 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ऍप आधारित कॅबचालकांकडून नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या भरारी पथकांनी ऍप आधारित कॅब वाहनांची व चालकांची नियमितपणे तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधित चालकावर तत्काळ कारवाई केली जाते. ताडदेव आरटीओ कार्यालयांतर्गत 590 वाहनांची तपासणी करून 107  दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 7 लाख 42 हजार रुपयांचा दंड वसूल केला. अंधेरी कार्यालयांतर्गत 782 वाहनांच्या तपासणीमध्ये 211 वाहने दोषी आढळली असून त्यांच्याकडून 7 लाख  93 हजार रुपये, वडाळा कार्यालयांतर्गत 318 वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये दोषी आढळलेल्या 173 वाहनांवर कारवाई केली आहे.