निसर्गमैत्र – सर्वसामान्यांचा शाम्पू

अभय मिरजकर  << [email protected] >>

साबणाचे झाड म्हणून ओळखले जाणारे झाड म्हणजे रिठा. सर्वसामान्यांचा शाम्पू आणि साबण म्हणजे रिठा होय. साधारण 35-40 वर्षांपूर्वी ग्रामीण भागात शाम्पू आणि साबण म्हणून याचा वापर केला जात होता. सध्या हा वृक्ष दुर्मिळ होत चालला आहे.

रिठा, अरिष्ट, फेनिल, रिंगिणी, पिठा, अरिठा, वैज्ञानिक नाव सापिंडस मुकोरोसी अशा याची विविध नावे आहेत. शिकेकाईमधील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे रिठा! औषधी गुणांनी तो परिपूर्ण आहे. रिठा मध्यम आकाराचा वृक्ष आहे. अनुकूल वातावरणात तो 20 मीटरपर्यंत उंच वाढू शकतो. साल करडी  व चकचकीत असून त्यावर खरबरीत व गळून पडणारे खवले असतात. पाने संयुक्त, एकाआड एक व मोठी असतात. पांढऱया रंगाची फुले हिवाळ्यात फुलतात. फुलांचा मोहर आंब्याच्या मोहरापेक्षा थोडा लहान असतो. बिया काळ्या, वाटाण्यापेक्षा दुप्पट आकाराच्या, गोल व कठीण असतात. रिठय़ाच्या फळांचा उपयोग मळ काढण्यासाठी होतो. रिठय़ाची फळे पाण्यात घुसळल्यास  फेस तयार होतो. म्हणून त्यांचा उपयोग साबणासारखा केला जातो. लोकरी, रेशमी, नाजूक व तलम सुती कपडे धुण्यासाठी रिठा वापरतात. तसेच वॉशिंग पावडरमध्येसुद्धा वापर करतात. सोन्याचे दागिने स्वच्छ व चकचकीत करण्यासाठी आणि साबण, शाम्पू व टूथपेस्ट बनविण्यासाठी तसेच कीटकनाशकांमध्ये रिठय़ाची फळे वापरली जातात.

रिठय़ाचे लाकूड कठीण, जड आणि पिवळसर रंगाचे असते. ते बांधकामासाठी आणि बैलगाडय़ा तयार करण्यासाठी वापरले जायचे. रिठय़ाच्या बियांपासून रोपे तयार करता येतात. रस्त्याच्या कडेला सावलीसाठी, उद्यानात शोभेसाठी आणि वनशेतीसाठी रिठा हा एक उपयोगी वृक्ष आहे. बियांचे तेल औषधी तर फूल पौष्टिक, विषबाधा कमी करणारे, स्तंभक (आकुंचन करणारे), ओकारी आणणारे, रेचक व भोवळ आणणारे असून त्याची पूड तपकिरीप्रमाणे ओढल्यास दमा, उन्माद, अर्धशिशी इत्यादींवर गुणकारी ठरते.

बिया भाजून चूर्ण करावे व तेवढय़ाच प्रमाणात तुरटी मिक्स करून दात घासल्यास दात हलणे, दात किडणे, दात दुखणे, हिरडय़ा सुजणे इत्यादी विकार दूर होतात. रिठय़ाची दहा ग्राम साल कुटून सकाळ-संध्याकाळ अर्धा चमचा मधासोबत घेतल्यास घसा दुखणे, गळ्याच्या गाठी, खवखवणे, लाल होणे हे त्रास बंद होतात. विंचूदंश व कोणताही विषारी कीटक चावल्यास रिठय़ाचे मगज व गूळ एकत्रित वाटून त्याच्या गोळ्या बनवाव्यात व पाच मिनिटांच्या अंतराने गोळी दिल्यास पंधरा मिनिटांत विष उतरते. त्याचे मगज व्हिनेगरसोबत वाटून त्याचा लेप कीटकदंशावर लावतात.

लहान मुलांच्या पोटात कृमी झाल्यास, पोट सतत दुखत असल्यास पाव ग्रॅम रिठय़ाची पावडर गुळातून चाटवल्यास कृमी पोटातून बाहेर पडून जातात. तोंडात कफ चिकटून राहत असल्यास रिठा तोंडात धरून थोडासा गिळत राहिल्यास कफ पातळ होऊन पडतो. फीट येऊन पडल्यास रिठा उकळवलेले पाणी नाकात सोडणे हा उत्तम उपाय आहे. कोणत्याही प्रकाराचे विष पोटात गेले तर रिठय़ाचे पाणी प्यायला द्यावे. त्यामुळे उलटी होते आणि विष उतरते. रिठा पाण्यात भिजवून ते चांगले कुस्करून अंगाला चोळल्यास अंगावर पित्ताचे पुरळ उठण्याचा त्रास कमी होतो. सांधेदुखी आणि अर्धांगवायूसाठी रिठय़ाच्या पानाचा रस उपयुक्त ठरतो. रिठय़ाच्या झाडाचे  अनेक पारंपरिक उपयोग आहेत. झाडाची साल दोरी आणि टोपल्या बनवण्यासाठी वापरली जाते. पानांचा उपयोग पशुधनासाठी चारा म्हणून केला जातो आणि बिया पारंपरिकपणे कीटकनाशक म्हणून वापरल्या जातात.