सूरत, इंदूरचे वारे पुरीपर्यंत आले! काँग्रेस उमेदवाराचा निवडणूक लढण्यास नकार

भाजपचे सूरत, इंदूरसारखे फोडाफोडीचे राजकारण सुरूच आहे. सूरत, इंदूरनंतर आता पुरीमध्येही याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. ओडिशातील पुरीतील काँग्रेस उमेदवार सुचारिता मोहंती यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. पक्षाकडून कुठलाही आर्थिक पाठिंबा मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पक्षाच्या फंडिंगशिवाय निवडणूक प्रचार करणे आपल्याला शक्य नाही. त्यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याचे मोहंती यांनी म्हटले आहे.

पुरी येथे भाजपाकडून संबित पात्रा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याठिकाणी काँग्रेसच्या सुचारिता मोहंती यांनी पक्षाचे महासचिव के. सी. वेणूगोपाळ यांना पत्र लिहून उमेदवारीतून माघार घेत असून तिकीट परत करत असल्याचे म्हटले आहे. मी प्रचारासाठी लागणारा अंदाजित खर्चही कमी करण्याचा प्रयत्न केला. आपण वैयक्तिक स्तरावर प्रचारएवढे पैसे जमा करू शकत नाही. मतदारसंघात प्रभावी प्रचार करण्यासाठी फंडची गरज आहे. फंडिंग कमी असल्याने आपल्याला माघार घ्यावी लागत असल्याचे सुचारिता मोहंती यांनी म्हटले आहे.