सांस्कृतिक उत्सव – परंपरा : प्रभादेवीची जत्रा

>> राज चिंचणकर

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध देवस्थानांच्या जत्रा भरतात. या जत्रा म्हणजे एकप्रकारचा सांस्कृतिक उत्सवच असतो. मुंबापुरीत आजही काही मोजक्या देवस्थानांच्या जत्रा भरलेल्या दिसतात. यातच एक आहे ती म्हणजे ‘प्रभादेवीची जत्रा’! पौष पौर्णिमा, म्हणजेच शापंभरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रभादेवीच्या जत्रेला प्रारंभ होतो आणि पुढचे 10 दिवस प्रभादेवीचा परिसर उत्साहाने फुलून जातो. यंदा 25 जानेवारीपासून प्रभादेवीच्या जत्रेला प्रारंभ झाला आहे. हा जत्रोत्सव, 3 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून या काळात प्रभादेवीचे मंदिर सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.

जत्रोत्सवाच्या काळात प्रभादेवीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. मंदिराचे आवार आणि मंदिराच्या मार्गावर फुले, प्रसाद, खेळणी, मिठाई व इतर खाद्यपदार्थ तसेच विविध प्रकारच्या वस्तूंचे अनेक स्टॉल्स थाटले जातात. या जत्रेचे वैशिष्टय़ असलेल्या खाजा, पेठा, चिक्की आदी जिन्नसांच्या स्टॉल्सवर मोठी गर्दी उसळते. जत्रेत मुलांसाठी उंच आकाशपाळणे उभे राहतात. जत्रेच्या काळात प्रभादेवीचे मंदिर पूर्ण दिवस दर्शनासाठी खुले असले तरी जत्रेतले स्टॉल्स मात्र दुपारनंतर उघडतात आणि मग रात्रीपर्यंत हा परिसर पार दुमदुमून जातो.

या परिसराला ‘प्रभादेवी’ हे नाव पडले ते ‘प्रभावती’ देवीच्या अस्तित्वामुळे आणि प्रभादेवीच्या याच मंदिरात ‘प्रभावती’ देवी स्थानापन्न आहे. प्रभावती देवीसह चंडिका व कालिकादेवीचेही गाभाऱयात स्थान आहे. प्रभावती देवीला, शापंभरी देवी म्हणूनही ओळखले जाते आणि ही देवी अनेक ज्ञातींची कुलदेवता आहे. पुरातन परिसर प्रशस्त आहे. मंदिरात एका भिंतीत एक शिलालेख कोरलेला आहे आणि त्यावर मंदिराच्या इतिहासाची नोंद दिसून येते.

इतिहासाच्या पानांत…

12 व्या शतकात एक बेट असलेल्या मुंबईवर राजा बिंब याचे राज्य होते. राजा बिंबने त्याचे प्रधान गंभीरराव सूर्यवंशी यांची कुलदेवता श्री कालिका देवी आणि पुरोहित हेमाडपंतांची कुलदेवता श्री चंडिका देवी यांचीही प्रभावती देवीसह येथे स्थापना केली. त्या काळात मुंबापुरीवर परकीय आक्रमणे होत असत. त्यामुळे प्रभावती देवीची मूर्ती प्रथम माहीमच्या खाडीत आणि नंतर प्रभादेवी परिसरातल्या विहिरीत लपवण्यात आली होती. 1714 मध्ये पाठारे प्रभू ज्ञातीतल्या श्याम नायक यांनी मूर्ती त्या विहिरीतून बाहेर काढून तिथे मंदिर उभारले.