खाऊगल्ली – मुंबईतल्या मराठी खाद्यपदार्थांची सैर

>> संजीव साबडे

मुंबईत बहुविध खाद्यसंस्कृती दिसून येत असली तरी खास मराठमोळ्या पदार्थांनी आपलं स्थान आणि आपली चव राखलेली आहे. अशाच काही चमचमीत, चविष्ट खाद्यपदार्थांची ही भ्रमंती.

गेल्या शतकाच्या सुरुवातीला फोर्ट आणि धोबी तलावकडून गिरगावात जाताना अनेक इराणी रेस्टारंट नजरेत भरायची. गिरगावात मराठी वस्ती भरपूर, पण एकही मराठी रेस्टॉरंट नव्हतं. कारण मराठी कुटुंबात हॉटेलातले खाऊ नये असे संस्कार. शिवाय बाहेर खाण्याची चैन परवडणारी नव्हती आणि तिथे आवडीचे प्रकार मिळायचे नाहीत.

अशा वेळी गिरगावातच राहणाऱया काकासाहेब तांबे आणि काही उद्यमशील ब्राह्मणांची बैठक झाली. आपल्या भागात इराणी हॉटेल खूप आहेत, त्यामुळे आपणही तसं काही सुरू करावं अशी चर्चा झाली. या चर्चेतून गिरगावात मराठी मंडळींची असंख्य दुग्ध मंदिरे झाली. पणशीकर, बाबुराव पुरोहित, पुढे लॅमिंग्टन रोडवर चाफेकर अशी दुग्ध मंदिरे सुरू झाली. दूध, पीयूष, दुधाची मराठी मिठाई असे प्रकार असायचे. त्या काळात रेस्टॉरंटमध्ये कुटुंबे जात नसत. त्यांनी यावं म्हणून त्यांच्यासाठी वेगळा दरवाजा, वेगळय़ा मजल्यावर बसायची सोय असायची. मग मराठी खाद्यपदार्थ, उपवासाचे पदार्थ त्यात मिळू लागले. दरम्यानच्या काळात मराठी थाळी मिळणारी रेस्टॉरंट सुरू झाली. वीरकर, कोना, तांबे, चाफेकर, पणशीकर, मॉडर्न, विनय, बाबुराव पुरोहित, आराम, गोविंदाश्रम, माधवाश्रम, मनोहर कोल्हापुरी चिवडा, भजीवाले कुलकर्णी अशी अस्सल मराठी शाकाहारी खाद्यपदार्थ, जेवण मिळणारी अनेक रेस्टॉरंट गिरगावात दिसू लागली. बोरीबंदर अन् शेअर बाजारापाशी आराम सुरू झाले.

कोना, वीरकर, कोल्हापुरी चिवडा, माधवाश्रम, गोविंदाश्रम ही प्रामुख्याने मराठी जेवणासाठी प्रसिद्ध. कोल्हापुरी चिवडा वगळता ती सर्व बंद झाली आहेत. रमेश महाजन यांच्या माधवाश्रमच्या ठिकाणी नवी इमारत होणार आहे. त्यानंतर ते म्हणे पुन्हा सुरू होणार आहे. फक्त बटाटा भजी व बटाटा भाजी देणारे कुलकर्णी केव्हाच बंद झालेत. खरवससाठी प्रसिद्ध असलेले मॉडर्नही बंद झालं. बाबुराव पुरोहित दुग्ध मंदिर पणशीकर यांनी घेतलं. ठाकुरद्वारातील प्रल्हाद भवन बंद झालं, पण त्या समोरचं टेंबे यांचं विनय हेल्थ होम जोरात सुरू आहे. इतकं की, दिवसभर तिथं गर्दी असते. खमंग, झणझणीत मिसळ, फराळाची मिसळ, साबुदाणा वडा, पीयूष, पुरणपोळी, मँगो लस्सी, उसळ, वांगी पोहे, अळूवडी, डाळिंबी उसळ, खमंग काकडी, ओल्या वाटाण्याचे पॅटिस, कोथिंबीर वडी असे शेकडो प्रकार त्यांच्या मेन्यू कार्डवर आहेत. शिवाय गिऱहाईकांच्या मागणीनुसार सँडविच, पिझ्झा, इडली, डोसा, जैन पदार्थ आहेतच.

लॅमिंग्टन रोडवरील चाफेकर दुग्ध मंदिरचा मेन्यूही असाच मोठा आहे. गिरगाव, ग्रँट रोडची बदलती वस्ती, बंद होत गेलेलं झालेलं इलेक्ट्रॉनिक व ऑटो मार्केट, स्थलांतरित झालेलं डायमंड मार्केट या साऱयांमुळे मेन्यू बदलावा लागला, पण खमंग काकडी, मसाला दूध, साबुदाणा वडा व खिचडी, कोथिंबीर वडी, राजगिऱयाच्या पुऱया व उपवासाची भाजी, मिसळ याबरोबर मेन्यूमध्ये दक्षिण व उत्तर हिंदुस्थानी, जैन हेही प्रकार आता आलेत. मेन्यूत बदल करणं गरजेचं होतं, अन्यथा मराठी रेस्टॉरंट आणखी अडचणीत आली असती, असं चाफेकरचे नंदू मोघे म्हणाले.

जगन्नाथ शंकरशेठ मार्गावरील पणशीकर यांच्याकडे या सर्व प्रकारांबरोबर मराठी मिठाई आणि चिवडा, चकली हेही असते. अगदी दुधी वडी, श्रीखंड वडी, तेलपोळी, गूळपोळी, विविध प्रकारची बर्फी मिळते. विठ्ठलभाई पटेल मार्गावरील प्रकाश दुग्ध मंदिरातही फक्त मराठी खाद्यपदार्थ मिळतात. मोहन बिल्डिंगमधील आराम ज्यूस सेंटरमध्ये अनेकदा मराठी मंडळी दिसतात. गिरगाव चर्चसमोरच्या मनोहर दुग्धालयात पूर्वी मराठी पदार्थ असत आता ते भाजीपावसाठी प्रसिद्ध आहे. गोविंदाश्रमातही भाजीपावच. ज्या काकासाहेब तांबे यांनी मराठी हॉटेलसाठी पुढाकार घेतला, त्यांच्या नावाचे ‘आहार भुवन’ आता ‘सुजाता रिफ्रेशमेंट’ झालेय. तर ठाकुरद्वारच्या नाक्यावरील ‘पणशीकर’ बंदच झालं.

गिरगावप्रमाणेच दादर हेही मराठी भाषकांचं गाव. तिथे रानडे रोडवरच्या पणशीकरमध्येही मराठी नियमित व उपवासाचे असंख्य प्रकार. मिठाई, डिंक व मेथीचे लाडू, मसाले भात, डाळिंबी उसळ व पुरी, भाजणीचं व उपवासाचं थालीपीठ, दोन्ही प्रकारच्या मिसळ. काय खावं आणि काय नको असं होतं. शिवाजी पार्कवरील ‘आस्वाद’ व ‘प्रकाश’ यांची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. ‘आस्वाद’बाहेर तर कित्येक जण उभे असतात. आतील टेबलं रिकामी व्हायची वाट पाहात. दादरमधील ते सर्वत्र लोकप्रिय मराठी शाकाहारी रेस्टॉरंट. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सरजोशी यांच्या ‘आस्वाद’चं उद्घाटन केलं होतं. ‘प्रकाश’ची गिऱहाईके इतकी पक्की की, ती अन्यत्र जात नाहीत. ‘दत्तात्रय’ बंद झालं, पण राहुल लिमयेंच्या ‘जीप्सी कॉर्नर’मध्ये पिठलं, भाकरी, ठेचा, उसळ खायला नेहमी गर्दी असते. ‘प्रकाश’च्या पुढे निखिल टिपणीस यांच्या ‘मराठी पंगत’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये केळीच्या पानावर जेवण वाढलं जातं. कित्ते भंडारी सभागृहापाशी ‘एकादशी’ रेस्टॉरंट आहे. दादर स्टेशनसमोर असलेल्या ‘मामा काणे’ची पुन्हा ओळख सांगायची गरजही नाही.

मराठी वस्ती जसजशी गिरगावातून कमी होऊन पूर्व, पश्चिम उपनगरांत व ठाणे, कल्याण, डोंबिवलीत वाढत गेली, तसतशी मराठी रेस्टॉरंट तिथे गेली. विलेपार्ले पूर्वेला एक पणशीकर आहे. स्टेशनसमोर जोगळेकर यांच्या ‘जीवन’मध्ये पुरणपोळी, अळूवडी आणि जवळपास सर्व मराठी पदार्थ असतात. गोरेगाव पश्चिमेला आरे रोडवरील ‘सप्रे अॅण्ड सन्स’ला 50 वर्षे झाली असतील. आता एका बाजूला रेस्टॉरंट, शेजारी मिठाई, चकल्या, चिवडे असे प्रकार. ते चांगलं चालतं. बोरिवली पश्चिमेच्या ‘गिरगाव कट्टय़ा’ला एकदा तरी भेट द्यायला हवी. तेथील मेन्यू कार्ड तर खाद्य पदार्थांइतकंच झणझणीत, चमचमीत, रसभरीत, कुरकुरीत, सात्त्विक, चटपटीत आहे. जणू संपूर्ण गिरगाव अवतीर्ण झाल्यासारखं वाटतं. घाटकोपरला लाल बहादूर शास्त्राr मार्गावरील ‘आई शप्पथ मराठी’ या हॉटेलात भरली वांगी, भरीत, मासवडी, पाटवडी, चुनवडी, कोकणी, खान्देशी, वैदर्भीय, घाटमाथा थाळी, सांडगे, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ यांच्या भाकऱया, वालाचं बिरडं या खास पदार्थांची रेलचेल दिसून येते. अख्ख्या मुंबईत महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतील खाद्यपदार्थांचा आस्वाद देणारं हे कदाचित एकमेव रेस्टॉरंट असू शकेल.

मुलुंड पश्चिमेला ‘मेतकूट’ या खमंग नावाचं रेस्टॉरंट आहे. आताच्या पिढीला मेतकूट नावाचा प्रकारही माहीत नसेल. पूर्वी गरम भातावर मेतकूट व तूप घातलं आणि ताटात लोणच्याची फोड असली की, अनेकांना चैन वाटायची. नागपुरी गोळेभात तर अनेकांनी पाहिलाही नसेल. मात्र ‘मेतकूट’मध्ये घरी एरवी न खाल्लेले वा बनवले जाणारे पदार्थ हमखास मिळू शकतात. नाहीतर हल्ली फणसाची भाजी कुठे केली जाते! बिरडं हा काय प्रकार असतो, गोडे व कडवे वाल यांत काय फरक आहे हेही माहीत नसतं. ‘मेतकूट’मध्ये वरणभात, तूप, तोंडली भात, पुडाची वडी, घडीची पोळी, पातोडी रस्सा, फणसाची भाजी, कुळथाचं पिठलं, साधं पिठलं व झुणका, असंख्य उसळी या जेवणाच्या प्रकारांबरोबर असंख्य मराठी स्नॅक्सही आहेत. मराठी माणसाचं तिथे नक्कीच मेतकूट जमेल.
[email protected]