बहुउपयोगी हुंब

अभय मिरजकर

पाने, फुले आणि फळांमुळे पक्षी मोठय़ा प्रमाणात झाडांकडे आकर्षित होतात. तसेच वेगवेगळय़ा प्रकारची फुलपाखरे या वृक्षांवर दिसून येतात. असा बहुउपयोगी हुंब लातूर जिह्यातील एक दुर्मीळ वृक्ष आहे. स्थानिक भाषेत याला हुम, पळाटी असेही म्हटले जाते. लातूर जिह्यातील चाकूर तालुक्यातील रामवाडी भागातील डोंगराळ भागात याची 50 तरी झाडे दिसून येतात. मात्र इतर कुठेही झाडे आढळून आलेली नाहीत, असे वृक्ष अभ्यासक सांगतात. त्यामुळे याला दुर्मीळ वृक्ष म्हणतात. हुंब हा एक देशी वृक्ष आहे. हुंबची फळे अनेक पक्षी, प्राणी व कीटकांच्या आवडीची आहेत. त्यामुळे या वृक्षांवर त्यांचा अधिक वावर आढळतो.फुलपाखरांचा अधिवास असणारा हा हुंब वृक्ष आहे. अनेक वेगवेगळय़ा प्रकारची फुलपाखरे या वृक्षांवर दिसून येतात. या झाडांच्या पानांवर फुलपाखरे अंडी घालतात. त्यातून निघणाऱया अळय़ा या झाडांची पाने खाऊन जगतात आणि त्यापासून फुलपाखरू तयार होते. याची फळे गोल, हिरव्या रंगाची पाच ते दहा एकत्रित घोसात येणारी आहेत. चार ते पाच सें. मी. व्यासाची आहेत. फळांचे देठ एक ते दीड सें. मी. लांब आहे. पिकल्यावर गडद जांभळय़ा रंगाच्या बिया होतात. फेब्रुवारी-मार्चमध्ये झाडाची पूर्ण पाने गळून जातात. फुले एप्रिल ते मेमध्ये येतात. मे ते जुलैदरम्यान फळे तयार होतात. ही पिकलेली आंबट, गोड फळे सगळय़ांसाठी खाण्यायोग्य आहेत.

हुंबचा औषधी उपयोगही आहे. अंगावरील सूज कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. विशेषता बाळंतपणानंतर अंगावरील सूज कमी करण्यासाठी कच्च्या वाळलेल्या फळांची पावडर करून त्याचा वाफाऱ्याचा शेक दिवसातून एक वेळा बाळंतिणीला देतात. अशक्तपणा कमी करण्यासाठी लहान मुलांना ताजी फळे खाण्यासाठी दिली जातात. सालीपासून तयार केलेला काढा हगवणीपासून आराम पडण्यासाठी दिला जातो. हुंबच्या लाकडाचा घरातील साहित्य, दरवाजे व खिडक्या, छपराचे वासे बनविण्यासाठी तसेच शेतीची अवजारे बनविण्यासाठी वापर केला जातो.

पाना-फुलांची भाजी
हुंबच्या कोवळय़ा पानांची व फुलांची भाजी केली जाते. त्यासाठी दोन ते तीन वाटय़ा हुंबची कोवळी पाने किंवा फुले घ्यावीत. एक मोठा बारीक कापलेला कांदा, एक ते दीड चमचा हिरवी मिरची व लसूण पेस्ट किंवा दोन कापलेल्या हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, जिरे, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ घ्यावे. कोवळी पाने/फुले निवडून स्वच्छ धुऊन कापून घ्यावीत. फुलांचे फक्त देठ काढून घ्यावेत. एका पातेल्यात पाणी गरम करून पाने/फुले वाफवून व पिळून घ्यावीत. एका कढईत तेल गरम करून जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी द्यावी. बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची-लसूण पेस्ट परतून घ्यावी. नंतर त्यात वाफवून पिळून घेतलेली पाने/फुले मोकळी करून चांगले परतवून घ्यावीत. पाच मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी.

> [email protected]