क्रीडा समुपदेशक – खेळाडूंचा मानसिक आधार

>> अविनाश कुलकर्णी, व्यवसाय मार्गदर्शक आणि समुपदेशक

खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांची मानसिक आणि शारीरिक कौशल्ये पूर्णपणे वापरण्यास सहाय्य करणे, विविध थिअरी  आणि चाचण्यांचा वापर करून त्यांना स्पर्धेसाठी तयार करणे, त्यांचे मनोबल वाढवणे अशी महत्त्वाची कामे मानसशास्त्रीय क्रीडा समुपदेशक करतात.

खेळाडूंसाठी शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त राहणे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच मानसिकदृष्टय़ा सक्षम राहणे हेदेखील असते. रागावर नियंत्रण, खेळ चालू असताना ताणतणावाचे व्यवस्थापन, दबावाचा योग्य वापर, परिस्थितीस अनुकूल असा निर्णय त्वरित घेणे, संघातील इतर खेळाडूंचे मनोबल वाढवणे हे सर्व खेळाडूंना करावे लागते. या ठिकाणी प्रशिक्षित क्रीडा समुपदेशक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.

प्रशिक्षण संस्थाः  मुंबई विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, रांची विद्यापीठ यांसह बहुतेक सर्व मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून पदव्युत्तर पदवी तसेच एम. फिल. आणि पीएच.डी. कोर्सेस उपलब्ध आहेत. मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमाचे उपप्रकार आहेत. क्रीडा मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमाची उपलब्धता मात्र प्रवेश घेण्यापूर्वी जरूर पहावी.  परदेशी विद्यापीठांमधूनदेखील स्पोर्टस् सायकॉलॉजी हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

शैक्षणिक अर्हताः मानसशास्त्रीय क्रीडा समुपदेशक होण्यासाठी बारावीनंतर मानसशास्त्रातील पदवी किंवा वर्तनाचे मानसशास्त्र या विषयातील पदवी किंवा तत्सम पदवी (बी.ए.) आवश्यक असते (किमान 3 वर्षे). विशिष्ट क्षेत्रात पारंगत होण्यासाठी क्लिनिकल सायकॉलॉजी किंवा क्रीडा मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन (पदवीनंतर किमान दोन वर्षे) तसेच एम. फिल. आणि पीएचडीदेखील करतात.

शिक्षण खर्चः  अभ्यासक्रमाचा बहुतांश भाग हा थिरॉटिकल आहे. त्यामुळे शैक्षणिक अर्हता मिळवण्यासाठी खूप खर्च करावा लागत नाही. पदव्युत्तर पदवीपर्यंत साधारणतः पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. आवश्यकतेनुसार संवाद कौशल्ये आणि इतर सॉफ्ट स्किल्स शिकता येतात.

आवश्यक कौशल्येः  मानसशास्त्रीय क्रीडा समुपदेशक होण्यासाठी शैक्षणिक पात्रतेबरोबरच खेळाची आवड, उत्तम संवाद आणि ऐकण्याचं कौशल्य, मदत करण्याची क्षमता, प्रामाणिकपणा, तणाव स्थितीतही चांगले काम करण्याची क्षमता, समस्येचे निराकरण करण्याची क्षमता आवश्यक असते. बेसिक प्रशिक्षणानंतर स्वतःस अद्ययावत ठेवणे खूप गरजेचे असते.

करीअरच्या  संधीः  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या जवळपास प्रत्येक क्रीडा प्रकारात खेळाडूंना मानसशास्त्रीय क्रीडा समुपदेशकांची गरज लागते. एखाद्या फिजिओथेरपिस्टप्रमाणे प्रत्येक खेळाच्या टीमबरोबर समुपदेशक सर्व ठिकाणी असेलच असे नसले तरी आवश्यकतेनुसार त्यांची सेवा घेतली जाते.

क्रिकेट, फुटबॉल यांसारख्या सांघिक खेळांच्या प्रत्येक टीमवर आपल्या देशात भरपूर खर्च केला जातो. त्यांना मानसशास्त्रीय क्रीडा समुपदेशकांची गरज लागते. डिप्रेशन टाळण्यासाठी अॅथलेटिक्स खेळाडूदेखील मानसशास्त्रीय क्रीडा समुपदेशकांची मदत घेतात.  उत्तम प्रशिक्षण घेतलेले मानसशास्त्रीय क्रीडा समुपदेशक स्वतंत्र व्यवसायदेखील करू शकतात. सुरुवात कठीण असली तरी चार-पाच वर्षांच्या अनुभवानंतर दहा ते बारा लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळवता येते.