मुलुंड-घाटकोपर आगारात काम बंद आंदोलन; बेस्टचे कंत्राटी कामगार आज संपावर

पगारवाढ, डय़ुटीचे वेळापत्रक, मोफत बसचा प्रवास अशा विविध मागण्यांसाठी मुलुंड-घाटकोपर बेस्ट आगारातील 500 हून अधिक कंत्राटी कामगारांनी आज काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकारकडून यावर आजही तोडगा न निघाल्याने उद्या गुरुवार, 3 ऑगस्टला 6 डेपोतील डागा ग्रुपच्या बसेस रस्त्यावर उतरणार नाहीत. दरम्यान, आजच्या काम बंद आंदोलनामुळे घाटकोपर आणि मुलुंड बस आगारातून 160 बसेस बाहेर पडल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, काम बंद आंदोलनाप्रकरणी डागा ग्रुपवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बेस्ट उपक्रमाने दिला आहे.

बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या गाडय़ांवर कंत्राटी वाहनचालक नेमले आहेत. यावरील पंत्राटी कर्मचारी मातेश्वरी कंपनी आणि डागा ग्रुपने नेमले आहेत. या कंत्राटी कर्मचाऱयांच्या विविध मागण्या आहेत. वेळेवर पगार मिळावा, तुटपुंजा पगार वाढवा, बेस्टच्या कर्मचाऱयांप्रमाणे बेस्ट बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करावी, नादुरुस्त बसेसची दुरुस्ती वेळेवर करावी अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मातेश्वरी कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. अशा स्वरूपाच्या मागण्या आता डागा ग्रुपच्या वतीने करण्यात आल्या असून मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा डागा ग्रुपच्या चालकांनी दिला आहे.

वाहतुकीवर परिणाम 

आझाद मैदानात सुरू असलेल्या बेस्टच्या कंत्राटी चालकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड येथील बेस्ट कंत्राटी कामगारांनी आज संप केला. बेस्ट कंत्राटी कामगार चालक आणि वाहक यांनी केलेल्या संपामुळे आज मुंबईतील बेस्ट वाहतुकीवर परिणाम झाला.

सात आगारांना बसणार फटका 

कंत्राटी कर्मचाऱयांचे आंदोलन उद्या गुरुवारीही कायम राहणार असल्यामुळे घाटकोपर, मुलुंड, देवनार, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, आणि गोराई या सात आगारांमधील प्रवाशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

बैठकीत तोडगा निघाला नाही 

विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज डागा ग्रुपच्या चालकांनी घाटकोपर आणि मुलुंड बस आगाराबाहेर काम बंद आंदोलन केले. आझाद मैदानातही त्यांचे उपोषण सुरू असून आज मंत्रालयात तोडगा न निघाल्याने उद्या डागा ग्रुपच्या सहा डेपोतील 575 बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर उतरणार नाही, असा इशारा डागा ग्रुपच्या चालकांनी दिला आहे. त्यामुळे आज झाला तसा उद्या गुरुवारीही प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागणार आहे.