स्वतः शहंशाहसारखे वागतात पण माझ्या भावाला शहजादा म्हणतात; प्रियांका गांधींचा मोदींवर हल्लाबोल

गुजरातच्या बनासकांठा येथील एका सभेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी स्वतः शहंशाहसारखे वागतात, पण माझ्या भावाला ते शहजादा म्हणतात. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी माझ्या भावाने 4 हजार किलोमीटरची भारत जोडो यात्रा पायी केली. जनतेशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्वसामन्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शहजादा पायी फिरेल का, असेही त्या म्हणाल्या. शहंशाह मोदी राजमहालात राहतात, त्यांना सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्या कशा समजणार, असा सवाल करत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ला चढवला.

नरेंद्र मोदी सत्ताप्रेमी आहेत. ते कोणाचेही ऐकत नाही. त्यांच्याविरोधात आवाज काढला तर तो आवाज दाबण्यात येतो. गुजरातने पंतप्रधानांना सन्मान दिला, स्वाभिमान दिला आणि सत्ता दिली. मात्र, आता ते गुजरातमधील सर्वसामान्य जनतेला विसरले आहेत. आता ते उद्योगपती आणि श्रीमंतांच्या गराड्यात असतात. तुम्ही कधी पंतप्रधानांना शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना पाहिले आहे. त्यांना कधी सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेताना बघितले आहे, असा सवालही प्रियांका यांनी केला.

संविधानामुळे सर्वसामान्यांना अधिकार आणि हक्क मिळतात. त्यामुळे आपण मतदान करून आपला नेता निवडू शकतो. तसेच नेत्याला प्रश्न विचारण्याचा किंवा त्याच्याविरोधात आंदोलन करण्याचा अधिकारही आपल्याला संविधानामुळे मिळाला आहे. आता जर पुन्हा भाजपचे सरकार सत्तेत आले, तर संविधान बदलण्याचा त्यांचा जाव आहे. त्यामुळे मूलभूत अधिकार आणि हक्कही आपल्याला मिळणार नाही,असा इशाराही प्रियांका गांधी यांनी दिला.