पोलीस बनले बिहारी अन् आरोपी स्वतःहून चालत आला; पळवून नेऊन केले लैंगिक शोषण

13 वर्षांच्या मुलीशी मैत्री करून त्याने तिला आपल्या जाळय़ात ओढले. मानसिक आधार देण्याचे नाटक करत तिला तो घेऊन गेला आणि निरागसतेचा गैरफायदा घेत तिचे शारीरिक शोषण करून सोडून दिले. आपल्या वासनेची भूक शमविल्यानंतर तो मुंबईबाहेर सटकण्याच्या बेतात होता. पण भोईवाडा पोलिसांनी बिहारी भाषेचा आधार घेत त्या आरोपीला शिताफीने पकडले.

मिथुनकुमार सरोज (26) असे  त्या आरोपीचे नाव आहे. तो गेल्या महिनाभरापासून हिंदमाता येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. मूळचा यूपीचा असलेला मिथुन विवाहित असून दोन वर्षांपासून मुंबईत राहतो. त्याची त्या पीडित 13 वर्षीय मुलीशी ओळख झाली आणि कालांतराने दोघांची चांगली मैत्री झाली. त्यांचे पह्नवर बोलणे वाढले. मिथुनने मुलीच्या निरागसतेचा फायदा घेत तिला शिताफीने आपल्या जाळय़ात ओढले.  मग 16 तारखेच्या रात्री मुलीला फूस लावून तिला पळवून नेले. त्या रात्री मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या पालकांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून उपायुक्त प्रशांत कदम, वरिष्ठ निरीक्षक सुभाष बोराटे, निरीक्षक संतोष कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन बोरसे, सूर्यकांत म्हेत्रे, अमित कदम व पथकाने तपास सुरू केला. मुलगी कुठे गेली, कोणासोबत गेली काहीच समजून येत नव्हते. बोरसे यांनी तांत्रिक तपास केला असता आरोपी कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे आढळून आले. पथकाने लगेच कुर्ला गाठले, पण काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर 17 तारखेला सकाळी आरोपी कल्याण येथे असल्याचे समजले. कल्याणलादेखील पथकाने जाऊन शोध घेतला, पण उपयोग झाला नाही.

मुलीकडे मोबाईल दिला अन्

17 तारखेला दुपारी मुलीच्या वडिलांना एक पह्न आला आणि मुलगी भिवंडी येथे असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी भिवंडी गाठून मुलीला ताब्यात घेतले. तिने घडलेली आपबिती सांगितल्यानंतर भोईवाडा पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी करून दाखल गुह्यात कलमांची वाढ केली. दरम्यान, मुलीकडे मिथुनचा पह्न मिळाला. त्या मोबाईलवरून पोलिसांनी त्याचे पह्टो मिळवले. तसेच तांत्रिक तपास करत असताना बोरसे यांनी त्या नंबरवर पह्न केला होता. तेव्हा ट कॉलरमुळे पोलीस आपल्याला पह्न करत असल्याचे लक्षात येताच त्याने मोबाईल मुलीकडे देऊन पोबारा केला होता.

 पाणीपुरीवाला बोलत हैं

 17 तारखेच्या संध्याकाळी मिथुनने मुलीकडे दिलेल्या मोबाईलवर पह्न केला. तेव्हा बोरसे यांनी बिहारी भाषेत संभाषण करून मिथुनची दिशाभूल केली. मी पाणीपुरीवाला असून त्या मुलीने तुझा मोबाईल माझ्याकडे दिलाय. आता प्रकरण मिटल्याने पोलिसांनीदेखील घरी पाठवले आहे. त्यामुळे मिथुनचा फोन आल्यास त्याला तो दे असे मुलीने सांगितल्याचे बोरसे खोटे बोलले. त्यावर विश्वास ठेवून मिथुन हिंदमाता येथे मोबाईल घ्यायला आला आणि अलगद पोलिसांच्या हाती लागला.