वाद मिटवायचा असेल तर प्रेयसीला 50 लाख रुपये द्या! अभिनेता अरमान कोहलीला हायकोर्टाचा मोठा दणका

बॉलीवूड अभिनेता अरमान कोहलीला मंगळवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. 2018 मधील मारहाण प्रकरणात पूर्णपणे तोडगा काढायचा असेल तर आधी ठरल्याप्रमाणे प्रेयसीला 50 लाख रुपये द्या, अन्यथा पुन्हा तुरुंगात पाठवू, अशी ताकीद देत न्यायालयाने कोहलीला आदेशाचे पालन करण्यासाठी 18 जुलैपर्यंतची मुदत दिली.

3 जून 2018 रोजी अरमान कोहलीने आधीची प्रेयसी नीरू रंधावा हिला क्रूरपणे मारहाण केली होती. तिला पायऱयांवरून खाली ढकलून डोके जमिनीवर आपटले होते. त्यात तिला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कोहलीला अटक करण्यात आली होती. नंतर दोन्ही पक्षकारांमध्ये सामंजस्य झाल्यामुळे न्यायालयाने एफआयआर रद्द केला आणि कोहलीची तुरुंगातून सुटका झाली होती. तथापि, कोहलीने सामंजस्य करारानुसार ठरलेले 50 लाख रुपये अद्याप दिलेले नाहीत. जे धनादेश दिले, तेदेखील बाऊन्स झाले.

त्यामुळे न्यायालयाने कोहलीविरोधातील एफआयआर रद्दचा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी करीत नीरू रंधावाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिच्या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. कोहलीने फसवणूक केल्याचा दावा नीरूच्या वकिलांनी केला. त्याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली आणि प्रेयसीचे 50 लाख रुपये देण्यासाठी कोहलीला अखेरची संधी दिली. प्रेयसीला 50 लाख रुपये द्या, अन्यथा पुन्हा तुरुंगात पाठवू, अशी ताकीद देत खंडपीठाने सुनावणी 18 जुलैपर्यंत तहकूब केली.