इराण-इस्रायल युद्धाने तणाव; शेअर बाजारात त्सुनामी, सेन्सेक्स 900 अंकांनी कोसळला

इराणने शनिवारी इस्रायलवर सुमारे 300 क्षेपणास्त्रे डागली. या दोन्ही देशातील तणावाचा जगभरात परिणाम होताना दिसत आहे. या दोन्ही देशातील युद्धसदृश्य परिस्थितीमुळे जगात चिंता वाढली आहे. त्याचा परिणाम सोमवारी शेअर बाजारावर दिसून आला. या तणावाच्या परिस्थितीमुळे शेअर बाजारात घसरणीची त्सुनामी आली आणि बाजार सुमारे 900 अंकांच्या घसरणीसह सुरू झाला. त्यानंतरही बाजार घसरणीतच सुरू आहे.

बाजाराचे कामकाज सोमवारी सुरु होताच बीपीसीएल, कोल इंडिया, टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, अदानी एंटरप्रायझेस, एनटीपीसी आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. प्री-ओपन मार्केटमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 929 अंकांनी घसरून 73315 अंकांवर आला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 300 अंकांपेक्षा जास्त घसरून 22,339.05180 अंकांवर आला होता.

देशाच्या बाजाराप्रमाणेच आशियाई शेअर बाजारातही घसरण दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजारासाह निफ्टी, निफ्टी नेक्स 50, मिड कॅप, स्मॉल कप, बँक निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली आहे. बँक निफ्टीमध्ये 550 अकांची मोठी घसरण झाली आहे. बँक, ऑटो, मेटल, तेल, हेल्थकेअर अशा सर्वच सेक्टरमध्ये घसरण दिसून येत आहे. इराण- इस्रायल तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. तसेच या परिस्थितीमुळे महागाईचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बाजारात घसरण दिसून येत आहे.