निवडणूक लढण्यास निधी नाही; पुरी येथील काँग्रेस उमेदवाराने लोकसभेचे तिकीट केले परत

ओडिशाच्या पुरी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. निवडणूक लढविण्यासाठी निधी मिळाला नाही, असे कारण देत मोहंती यांनी त्यांना मिळालेले तिकीट परत केले आहे.

कॉँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांना एक पत्र लिहून सुचरित्रा मोहंती यांनी आपण लोकसभेची निवडणूक लढवू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मी एक व्यावसायिक पत्रकार होते. 10 वर्षांपूर्वी राजकारणात आले होते. पुरी येथील प्रचारात मी माझे सर्वस्व दिले. मी सार्वजनिक देणगीचाही प्रयत्न केला, पण यश मिळाले नाही. पक्षाच्या निधीशिवाय निवडणूक प्रचार शक्य होणार नसल्याचे पत्रात म्हटले आहे.

लोकसभा निवडणूक लढण्यासाठी माझा पक्ष मला निधी देऊ शकला नाही. राज्यातील 7 विधानसभा मतदारसंघांतील काही जागांवर पक्षाने विजयी नेत्यांना तिकीट देण्याऐवजी कमकुवत उमेदवार उभे केले आहेत. मी अशाप्रकारे निवडणूक लढवू शकत नाही, असे मोहंती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संबिता पात्रा, अरुप पटनायक रिंगणात

पुरी लोकसभा मतदारसंघात सध्या बीजेडीचे पीनाकी मिश्रा खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार संबित पात्रा यांचा 12 हजार मतांनी पराभव केला होता. यावेळी भाजपकडून पात्रा तर बीजेडीकडून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक निवडणुकीच्या रिंगणात आहेत.