न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या

पुणे कल्याणीनगर येथील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली. महाराष्ट्रात गरीब आणि श्रीमंतांसाठी वेगवेगळे कायदे आहेत का? असा सवालही त्यांनी त्यात केला आहे.

वेदांत अग्रवाल या बिल्डरपुत्राने दारूच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून दोघांचा जीव घेतला आणि पुणे पोलिसांनी तपासकामी हलगर्जीपणा केला असे आतापर्यंत समोर आले आहे. घटना गंभीर असतानाही 15 तासांत आरोपीची सुटका होऊ शकते हे अनाकलनीय आहे. यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. बेकायदेशीर घटनांमध्ये भाजपचा संबंध असला की, देवेंद्र फडणवीस जातीने घटनास्थळी पोहोचतात, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. त्याची उदाहरणेही त्यांनी दिली आहेत. कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱयाला अटक झाली तेव्हा फडणवीस यांनी मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस कारवाईत हस्तक्षेप केला. घाटकोपरमध्ये भाजप उमेदवाराने पैसे वाटल्याचे प्रकरण झाले तिथेही फडणवीस गेले होते, असे म्हणत पटोले यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.