नालेसफाई ‘100 टक्के’चा दावा, नाले मात्र तुंबलेलेच! पावसाळय़ात मुंबई तुंबण्याचा धोका

मुंबईतील नालेसफाई 100 टक्के झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने ‘डॅशबोर्ड’ केला असला तरी शहर आणि दोन्ही उपनगरांत अनेक नाले अजूनही तुंबलेले असल्याचेच चित्र दिसत आहे. त्यामुळे या वर्षी अतिवृष्टीत मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातच पावसाळा तोंडावर आल्यामुळे पालिका शिल्लक काम कसे करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईत दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला नालेसफाईचे काम सुरू होते. मात्र या वर्षी हे काम 15 ते 20 दिवस उशिराने सुरू झाल्यामुळे 31 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण होणार का हा सवाल आधीच निर्माण झाला होता. मात्र नालेसफाई वेगाने सुरू असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत होते. यातच 31 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे टार्गेट असताना पालिकेने दहा दिवस आधीच 100 टक्के काम फत्ते केल्याचा दावा केला आहे. याबाबत पालिकेच्या वेबसाईटवरील डॅशबोर्डवर याबाबत आकडेवारीदेखील प्रसिद्ध केली आहे. मात्र अनेक ठिकाणी नाले अद्याप तुंबलेलेच असल्याचे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी नालेसफाईच्या पाहणी दौऱयादरम्यान जाहीर सांगितले आहे. त्यामुळे मिंधे-भाजप सरकारच्या काळात या वर्षी नालेसफाई परिणामकारक झाली नसल्याने पावसाळय़ात मुंबई तुंबणार असल्याचे चित्र दिसत आहे.

आता टक्क्यावर नाही तर 100 मीटरप्रमाणे तपासणी

मुंबईतील नालेसफाईची आकडेवारी डॅशबोर्डवर 100 टक्के झाल्याचे स्पष्ट दिसत असले तरी प्रत्यक्षात नाले तुंबलेले असल्याने पालिकेवर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात तक्रारी करण्यात येत आहेत. त्यामुळे नालेसफाई परिणामकारक होण्यासाठी आता टक्केवारीवर नाही तर प्रत्येक 100 मीटर नाल्याच्या कामाचा अहवाल पंत्राटदाराला पालिकेला सादर करावा लागणार आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पंत्राटदारांना अहवाल देण्याचे निर्देश दिल्याचे समजते.

असे झाले काम

– यावर्षी 31 मेपर्यंत पावसाळय़ापूर्वी एकूण 10 लाख 21 हजार 782.1 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यातील सर्व गाळ काढला असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

– मुंबईत पावसाळय़ाआधी एकूण नालेसफाईच्या 75 टक्के नालेसफाई केली जाते. यामध्ये पावसाळय़ात 10 टक्के तर पावसाळय़ानंतर 15 टक्के नालेसफाईचे काम केले जाते.

पालिका आयुक्तांकडून पाहणी

दरम्यान, पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी आज सरप्राइज व्हिजिट देऊन मिठी नदी आणि वाकोला नदीमधील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली. याशिवाय नदी रुंदीकरण, संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचीही पाहणी केली. रुंदीकरणात अडथळा ठरणारी बांधकामे न्यायालयाचा आदेश प्राप्त करून कारवाई करावी, असे निर्देशही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱयांना दिले.