मोदींच्या एका फोनवर रशिया- युक्रेन युद्ध थांबले; अजित पवार म्हणाले…

मोदींच्या एका फोनमुळे रशिया-युक्रेन युद्ध थांबले. हे येरागबाळय़ाचे काम नाही. त्यासाठी धडाकेबाज नेता लागतो, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मोदींचे तोंडभरून कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवले आणि तिथे अडकलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना बाहेर काढले, अशी बढाई सत्ताधारी भाजपचे नेते नेहमीच मारत असतात. त्यात आता अजित पवार यांचीही भर पडली आहे.

सातारा येथील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, हिंदुस्थानातील काही विद्यार्थी युक्रेनला शिक्षणासाठी गेले होते. रशियाने युक्रेनवर हल्ला केला. यामुळे अनेकांनी आमच्याशी संपर्क साधून आपली मुले संकटात सापडल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही मोदींशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला काळजी न करण्याचा सल्ला दिला. तुम्ही चाट पडाल, पण मोदींनी युक्रेनचे युद्ध थांबवण्यासाठी थेट पुतीन यांना फोन करून युक्रेनमधील हिंदुस्थानी विद्यार्थी बाहेर काढेपर्यंत युद्ध थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर काही काळ युद्ध थांबले. त्यानंतर विशेष विमान पाठवून सर्व विद्यार्थ्यांना बाहेर हलवण्यात आले, असे अजित पवार म्हणाले.

आपला शेजारी पाकिस्तानी काही कुरापती करायचा, पण त्याला पुलवामानंतर असा दणका दिला की, त्यानंतर त्याने आपल्याकडे पाहिलेही नाही. आता तो गप्पगार बसला आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.