महिलेचे अपहरण केल्याप्रकरणी एचडी रेवन्नाला SIT ने घेतले ताब्यात

माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा मुलगा JDS नेते एचडी रेवन्ना याला कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने अटक केली आहे. महिलांचे लैगिंक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसेच एका पीडित महिलेचे अपहरण केल्याचा आरोप सुद्धा त्याच्यावर लावण्यात आला आहे.

2 मे रोजी पीडित महिलेचा मुलगा राजू एचडी याने केआर नगर पोलीस स्टेशनमध्ये एचडी रेवन्नाच्या विरोधात आईच्या अपरहणाची तक्रार दाखल केली होती. पीडित महिला लैगिंक शोषणाची शिकार ठरली होती. मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना 29 एप्रिल रोजी घडली आहे. पीडित महिलेने सहा वर्ष होलेनरासीपुरामध्ये रेवन्नाच्या घरी आणि फार्माहाउसवर काम केले होते. मात्र तीन वर्षांपुर्वी तीने काम सोडून दिले आणि घरी येऊन रोजंदारीवर काम करण्यास सुरुवात केली. मात्र 29 एप्रिल रोजी रात्री 9 च्या सुमारास सतीश बबन्ना पीडित महिलेच्या घरी आला. रेवन्नाची पत्नी भवानी हिला काही कामासाठी तुमची गरज असल्याचे सांगत तो पीडित महिलेला घेऊन गेला. त्यानंतर पीडित महिला पुन्हा घरी आली नाही. त्यामुळे मुलाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी रेवन्ना चा खास माणूस सतीश बबन्नाला अटक केली होती.

या प्रकरणातून वाचण्यासाठी एचडी रेवन्नाने न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र कोर्टाने त्याचा अर्ज आज (04-05-2024) फेटाळून लावला. लोकप्रतिनिधी न्यायालयाचे न्यायाधिष संतोष गजानन भट्ट यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावत पुढील सुनावणी 6 मे रोजी होणार असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी रेवन्ना आणि सतीश बबन्नाच्या विरोधात अपहरण आणि इतर आरोपांसह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

एचडी रेवन्ना आणि त्याचा मुलगा प्रज्वल यांच्याविरोधात यापुर्वी सुद्धा लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. तसेच इंटरपोलकडून प्रज्वलविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती सीबीआयला करण्यात आली होती.