आधी माणसं मारली, मग रॅप बनवला! वेदांत अगरवालच्या व्हायरल व्हिडीओमुळे संताप

pune-Porsche-car-accident

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघाताने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. वडिलांनी दिलेल्या पोर्श गाडीने दोन जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन वेदांत अगरवाल याला अवघ्या पंधरा तासात जामीन मंजूर झाला आणि राज्यात संतापाची लाट उसळली. दोन जिवांची हत्या करणाऱ्याला निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन त्याला वाचवण्यात गर्क असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी नव्याने कारवाईची मागणी बालहक्क मंडळाकडे केली. त्यानंतर त्याला 14 दिवस सुधारगृहात पाठवण्यात आलं.

मात्र, जामीन मिळाल्यानंतरचा वेदांत याचा एक रॅप व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात तो पैशाच्या गुर्मीत बोलताना दिसत आहे. आपण दोन निष्पाप जिवांना चिरडून ठार मारलंय, याचा लवलेशही त्याच्या आविर्भावात दिसून येत नाही. तसंच रॅप गाण्यासाठी वापरलेल्या शब्दांतून त्याची राक्षसी वृत्ती स्पष्ट होत आहे. ‘करके बैठा मै नशे…इन माय पोर्शे, सामने आया कपल मेरे, अब वो है निचे… साऊंड सो क्लिशे.. सॉरी गाडी चढ आप पे, 17 साल की उमर, पैसे मेरे बाप के.. 1 दिन में मिल गयी मुझे बेल.. फिर से दिखा दुंगा सडक पे खेल’ असं तो या व्हिडीओत म्हणताना दिसतो.

किंचितही पश्चात्ताप होत नसून आपण पुन्हा हे कृत्य करणार असल्याचं अप्रत्यक्षपणे तो या व्हिडीओत कबूल करताना दिसत आहे. त्याला जामीन मिळाल्यानंतरचा हा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडीओ पाहून आता नेटकऱ्यांपासून सामान्यांपर्यंत संताप सातव्या आसमानावर पोहोचला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ खरा आहे की डीपफेक याचा तपास आता पोलीस करत आहेत.