Lok Sabha Election 2024 : ऊसतोड मजुराचा मुलगा राम सातपुते यांनी निवडणुकीत केला सर्वाधिक खर्च

यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून, सोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांनी निवडणुकीसाठी खर्च केले आहेत. खर्चाच्या या तपशिलामध्ये ऊसतोड मजुराचा मुलगा म्हणून प्रचार करणारे सोलापुरातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि माढा लोकसभेतील भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनाही मागे टाकले.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी खर्च केलेल्याचा तपशील निवडणूक खर्च कक्षाकडे सादर केले आहेत. 7 मे पर्यंतचा तपशील प्राप्त झाला असून, यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी 81 लाख 78 हजार 56, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे 74 लाख 53 हजार 181 रुपये, माढा लोकसभेतील भाजपाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी 62 लाख 69 हजार 598, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी 51 लाख 96 हजार 808 रुपये खर्च केला आहे. अंतिम खर्चाची रक्कम 29 जून रोजी निश्चित होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी, ‘मी गरीब कुटुंबातील असून, ऊसतोड मजुराचा मुलगा आहे. लहानपणी आई-वडिलांबरोबर जिह्यात ऊसतोडीचे काम केले आहे,’ असे ते जाहीर प्रचारात सांगत होते. मात्र, ऊसतोड मजुराच्या मुलाने निवडणुकीकरिता सर्व बलाढय़ उमेदवारांना मागे टाकत केलेला सर्वाधिक खर्च सध्या जिह्यात चर्चेचा विषय आहे.