देशातील वातावरण मोदी व भाजपच्या विरोधात

देशभरातले वातावरण भाजप आणि मोदींच्या विरोधातील आहे. याची जाणीव भाजपला होत आहे. गेल्या दहा वर्षांत काहीच काम न झाल्याने ते मोदी आणि भाजपच्या नेत्यांना ते सांगता येत नाहीय. म्हणूनच भाजपचे नेते काँग्रेस आणि राहुल गांधी यांचाच जप करत आहेत, अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या सुप्रिया श्रीनेत यांनी आज भाजपवर हल्लाबोल केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय ही भाजपला गुंगवणारी चाल आहे. यामुळे भाजपची रणनीती उद्ध्वस्त झाली. आता अमेठीत एक सक्रिय कार्यकर्ता भाजपच्या उमेदवारावर सहज मात करेल, असा विश्वास यावेळी  सुप्रिया सुनेत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला, तर भाजपला बाहेरुन उमेदवार आयात करावे लागले, असा आरोपही त्यांनी केला.

उज्ज्वल निकम यांच्यावर टीकास्त्र

ऍड. उज्ज्वल निकम हा खोटारडा आणि निर्लज्ज माणूस आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. कसाबच्या बिर्याणीबाबत त्यांचा खोटेपणा उघड झाला. खोटेपणाची त्यांनीच कबुली दिलेली आहे. आता पुन्हा हाच माणूस उलटय़ा उडय़ा मारत आहे. एका महिलेला डावलून भाजपने ऍड. निकम यांना उमेदवारी दिली आहे, अशी टीका सुप्रिया श्रीनेत यांनी यावेळी केली. तर त्याचबरोबर त्यांनी पियूष गोयल यांच्यावरही निशाणा साधला.