दोन उपमुख्यमंत्र्यांकडून मतासाठी धमक्या देण्याचे उद्योग सुरू

लोकसभा निवडणुकीत जातीय विद्वेष पसरविण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. जनाधार विरोधात चालल्यामुळे दोन उपमुख्यमंत्र्यांकडून मतासाठी उठसूट विरोधी पक्षातील लोकांना धमक्या देण्याचे उद्योग सुरू असल्याचा आरोप सोलापूर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणीती शिंदे यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांच्या गटाकडून सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या म्हणाल्या, एकटय़ा महिलेच्या विरोधात राज्यातील नेत्याबरोबर आता उत्तर भारतातील नेते प्रचारात आणून शहरात जातीय द्वेष पेरण्याचे काम सत्ताधाऱयांकडून सुरू आहे. सोलापूरला यूपी, बिहार बनवण्याचे काम सध्या भाजपवाल्यांकडून सुरू असल्याची टीका केली.

z सत्ताधाऱयांनी सातत्याने शेतकऱयांवर अन्याय करण्याचे काम केले. यामुळे ही निवडणूक आता लोकांनीच हातात घेतली आहे. कर्नाटकातील उमेदवाराने अडीच हजार महिलांवर अत्याचार केला आणि पंतप्रधान म्हणतात, त्यांच्याकडे बघून मतदान करा. आता अशा लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या.