मोदींनी दहा वर्षांत जनतेचे अधिकार कमकुवतकेले; प्रियांका गांधी यांचा हल्ला

माझ्या भावाला शहजादा म्हणतात आणि मोदी स्वतः शहेनशहासारखे महालात बसले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या आजुबाजुचे लोक घाबरतात. त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याची हिंमत कोणी करत नाही. कुणी आवाज उठवला तरी त्याचा आवाज दाबला जातो. त्यांना राज्यघटना बदलायची आहे, म्हणजेच तुम्हाला मिळालेले अधिकार कमकुवत करायचे आहेत. मोदींनी गेल्या 10 वर्षांत केवळ जनतेचे अधिकार कमकुवत करण्याचे काम केले, अशा शब्दांत कॉँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील बनासकांठा येथील लाखनी येथे प्रियांका गांधी यांची जाहीर सभा झाली. यावेळी प्रियांका यांनी राहुल गांधींना शहाजादा असं संबोधण्यावरून मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला. हाच शहजादा देशाच्या भगिनी, शेतकरी आणि मजुरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 4 हजार किलोमीटर पायी चालला आहे. मोदींकडे बघा, त्यांचा चेहरा बघा, हे अगदी स्पष्ट आहे. स्वच्छ कपडे आणि एक केसही इकडून तिकडे फिरकत नाही. त्यांना तुमच्या समस्या कशा समजतील, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला.

कोरोनामुळे लोक मरत असताना भाजप देणग्या गोळा करत होता

कोरोनामुळे लोक मरत असताना भाजप कंपन्यांकडून देणग्या गोळा करत होता. मोदींनी कोविड लस बनवण्याचा परवाना दिला होता, त्या कंपनीकडून पक्षाने देणग्या घेतल्या. आज या लसीचे दुष्परिणाम होत असल्याच्या बातम्या येत आहेत. भाजपने आमची बदनामी केली आणि आज जगातील सर्वात श्रीमंत पक्ष बनला आहे. कार्यालय 60 हजार कोटी रुपयांना बांधले, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला.

मोदीजींना गुजरातच्या जनतेचा विसर पडला

मोदींना आता गुजरातची जनता ओळखत नाही, जर ते गुजरातच्या लोकांपासून तोडले गेले नाहीत तर ते इथून निवडणूक का लढवत नाहीत. कारण मोदींना तुमच्याकडून जो काही फायदा घ्यायचा होता, त्याचा फायदा त्यांना झाला. पंतप्रधान झाल्यानंतर मोदीजींना गुजरातच्या जनतेचा विसर पडला आहे, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.