भाजप-मिंध्यांमध्ये हिंमत नसल्यानेच डुप्लिकेट उमेदवार उभे केले आहेत ! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

‘चारशे पार’चा दावा करणाऱया भाजप-मिंध्यांना आता निवडणूक जिंकायचीही खात्री राहिलेली नाही.  त्यामुळेच फक्त मुंबईतच नव्हे तर कोकणातही महाविकास आघाडीच्या विरोधात डुप्लिकेट उमेदवार उभे करीत आहेत. कारण त्यांच्यात आता निवडणूक जिंकायची हिंमत राहिलेली नाही, असा घणाघात शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज चिपळूण येथे केले.

शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांच्यासाठी चिपळूण आणि सावंतवाडी येथे महाविकास आघाडीच्या प्रचंड सभा झाल्या. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि मिंध्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांच्यात आता हिंमत उरली नसल्याने त्यांनी आता समान नावाचे उमेदवार उभे केले आहेत. काही ठिकाणी चिन्हे जवळची जवळची दिली आहेत. डुप्लिकेट नावाचे उमेदवार उभे करूनही यांची मते यांना मिळत नाहीत. गेल्या दहा वर्षांत जनतेला दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे भाजप ही निवडणूक जिंकत नाही हे लिहून घ्या, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत, काँग्रेस नेते माजी खासदार हुसेन दलवाई, शिवसेना संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, माजी आमदार रमेश कदम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, प्रशांत जाधव, माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, यवतमाळचे उमेदवार संजय देशमुख, बाळा कदम, शशिकांत मोदी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

साऊथ मे साफ, नॉर्थ मे हाफ

‘शायनिंग इंडिया’प्रमाणेच यावेळी ‘अब की बार चारसौ पार’चा नारा दिला होता. ते चारसौ पार आता गायब झाले आहे. नंतर आले मोदी सरकार. तेही गायब झाले. मग भाजप सरकारवर आले. तेही गायब झाले. आणि आता एनडीए सरकारवर आले आहेत. आज भाजपची अशी अवस्था आहे की, चारशे पार नाही, तर दोनशे पारही करू शकत नाही, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. काही दिवसांपूर्वी मी काँग्रेसचा एक नारा ऐकला होता. ‘साऊथ मे साफ और नॉर्थ मे हाफ.’ दक्षिण भारतात पाहिले तर भाजपची ना तामीळनाडूमध्ये सीट येत आहे, ना केरळमध्ये, ना कर्नाटकमध्ये. आंध्र प्रदेशमध्येही त्यांची सीट येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

दंगलीवर भाजप आपली पोळी भाजते

मणिपूरमध्ये महिलांवर बलात्कार होतायत. नागरिकांच्या मुंडय़ा छाटल्या जात आहेत. दंगली घडतायत. दंगली भाजपला आवडतात. भाजप दंगलीवर आपली पोळी भाजते आणि सत्ता गाजवते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना कोविड आला. वादळे आली, पूर आला. त्यावेळी तुमच्या मदतीला भाजपचा दिल्लीतला कोणी मंत्री आला का? तुमच्या मदतीला महाविकास आघाडी होती. कोविड काळातही जगभरात एकमेव पक्ष राजकारण करत होता तो म्हणजे भाजप पक्ष, असा टोलाही त्यांनी लगावला.

मशाल देश आणि महाराष्ट्रावरील संकट दूर करेल

आम्ही केलेलं मुंबई-गोवा हायवेचं काम कम्प्लिट झाले पण महायुती सरकारच्या काळात मात्र फक्त भूमी पूजने झाली. विकासात्मक कामासाठी महाविकास आघाडी सरकारची नितांत गरज आहे. भाजप सरकार आता केंद्रातून तडीपार करण्याची आवश्यकता आहे. देशात आता परिवर्तनाची लाट आली आहे. महाराष्ट्र आणि देशातून आता भाजप हद्दपार होणार आहे, असा विश्वास सावंतवाडी येथील गांधी चौकात आयोजित प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात मध्ये गेले तेव्हा राणे, केसरकर मूग गिळून होते. मी मात्र भाजपशी थेट भिडलो. कदाचित यांचं राज्य पुन्हा आलं तर मुंबईचं मंत्रालयदेखील गुजरातला नेतील इतकं भयानक यांचं वागणं आहे, असेही ते म्हणाले. तरुण बेरोजगार, शेतकऱयांवर अन्यायासह कष्टकरी जनतेला भाजपने कायमच फसवलं. हे मिंधे, खोके सरकार फक्त जनतेला फसविणारे असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी आमदार वैभव नाईक, अतुल रावराणे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, महिला उपनेत्या जान्हवी सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, शैलेश परब, साक्षी वंजारी, अर्चना घारे-परब, संजय पडते, अमित सामंत उपस्थित होते.