
मध्य प्रदेशातील कटनी जिल्हा येथे रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत बिहारहून महाराष्ट्रात नेण्यात येत असलेल्या तब्बल 163 अल्पवयीन मुलांची सुटका केली आहे. शनिवारी उशिरा रात्री झालेल्या या संयुक्त कारवाईत रेल्वे संरक्षण बल (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलीस (GRP) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणामुळे बालतस्करीच्या गंभीर प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वय 6 ते 13 वर्षे दरम्यान असलेली ही मुले बिहार राज्यातील अररिया भागातून लातूर येथे मजुरीसाठी नेली जात होती. बालकल्याण समितीकडून (CWC) मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. त्यानुसार कटनी रेल्वे स्थानकावर सापळा रचण्यात आला.
पाटणा-पुर्णा एक्सप्रेस ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येताच RPF आणि GRP च्या पथकांनी डब्यांची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या 8 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या सर्वांकडे वैध तिकीट किंवा आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संशय अधिक बळावला आणि तत्काळ सर्व मुलांना सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.
Katni, Madhya Pradesh: Over 165 minor children were deboarded from the Patna–Pune Express at Katni Railway Station following suspicion of child labor and trafficking. Authorities, including RPF and child protection teams, intervened and began investigations. The children,… pic.twitter.com/zn1CT3DBiZ
— IANS (@ians_india) April 11, 2026
कटनी येथील RPF निरीक्षक वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात ही मुले अररिया येथून लातूरकडे कामासाठी नेली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी GRP ने भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 143(4) अंतर्गत (18 वर्षांखालील मुलांची तस्करी) गुन्हा नोंदवला असून अटक करण्यात आलेले सर्व आरोपी बिहारमधील विविध जिल्ह्यांतील आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
कारवाईनंतर मुलांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बालसंरक्षण अधिकारी मनीष तिवारी यांनी सांगितले की, मुलांची समुपदेशन प्रक्रिया सुरू असून त्यांच्या पालकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच मुलांचे वय, ओळख आणि प्रवासाचा उद्देश याची पडताळणी केली जात आहे.
सध्या काही मुलांना कटनी येथे, तर काहींना जबलपूर येथील बालसंरक्षण केंद्रात ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे अल्पवयीन मुलांची तस्करी आणि मजुरीसाठी होणाऱ्या बेकायदेशीर हालचालींचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला असून संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणात पुढील कारवाई केली जात आहे.




























































